नाशकात पेट्रोल दरवाढीचा उच्चांक; असे कसे अच्छे दिन? संतप्त सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:13 PM2018-09-09T16:13:58+5:302018-09-09T16:16:45+5:30
रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता. ८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती.
नाशिक : एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ सातत्याने केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ‘चटका’ बसत आहे. सत्तेत येण्याअगोदर भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले असून, रविवारी (दि.९) पेट्रोल प्रति लिटर ८८.३६ पैसे इतके झाले. दरवाढीचा हा अद्यापपर्यंतचा उच्चांक नोंदविला गेला. त्यामुळे भाजपाचे असे कसे अच्छे दिन? असा संतप्त सवाल नाशिकरांनी उपस्थित केला आहे.
देशभरात इंधनदरवाढीने नागरिक त्रस्त झाले असून, सर्वच विरोधी पक्ष इंधनदरवाढीविरोधात एकवटले आहे. विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या हाकेला सर्वपक्षीय धार मिळाली असून, प्रवासी वाहतूकदारसंघटनाही या बंदमध्ये सहभागी होण्याची चिन्हे आहेत. इंधनदरवाढीमुळे सर्वच क्षेत्रात महागाई चक्रकार पद्धतीने झिरपत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपा सरकारविरुद्ध रोष तीव्र होऊ लागला आहे. सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली असून, सरकारने देशभरात इंधनाच्या दरावर त्वरित नियंत्रण मिळविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकूणच नागरिकांच्या वाढत्या रोषाबरोबरच या सरकारला विरोधी पक्षांच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे.
रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता. ८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती. तसेच पॉवर पेट्रोलचे दर ९१.१८ रुपयांवर पोहचले होते, तर डिझेलचे दर ७६.३५ रुपयांवर पोहचले होते. डिझेल दरवाढीचाही हा उच्चांक ठरला. आतापर्यंत डिझेलचे दर चालू आठवड्यात ७४ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र रविवारी थेट ७६ रुपयांच्या पुढे दर गेल्याने मालवाहू वाहनांसह काही कौटुबिंक मोटारचालकांनीही नाराजी व्यक्त केली. परिणामी नागरिकांनी गरजेपुरतेच घराबाहेर पडणे रविवारी पसंत केले.
इंधनदरवाढीचा साप्ताहिक आढावा. (दर प्र.लिटर)
दिनांक | पेट्रोल | डिझेल | पॉवर पेट्रोल | टर्बो डिझेल |
---|---|---|---|---|
१ सप्टें. | ८६.५४ | ७४.०६ | ८९.३६ | ७७. २७ |
२ सप्टें. | ८६.७१ | ७४.४२ | ८९.८५ | ७८. ०५ |
३ सप्टें. | ८७.०३ | ७४.८४ | ८९.८५ | ७८. ०६ |
४ सप्टें. | ८७.१९ | ७५.०४ | ९०.०१ | ७८.२५ |
५ सप्टें. | ८७.१९ | ७५.०४ | ९०.०१ | ७८.२५ |
६ सप्टें. | ८७.३८ | ७५.२५ | ९०.२० | ७८.४७ |
७ सप्टें . | ८७.८६ | ७५.७९ | ९०.६७ | ७९.०० |
८ सप्टें. | ८८.२४ | ७६.२५ | ९१.०६ | ७९.४६ |
९ सप्टें. | ८८.३६ | ७६.२५ | ९१.१८ | ७९.५६ |