पीएफ खाती सील
By admin | Published: December 22, 2015 12:25 AM2015-12-22T00:25:36+5:302015-12-22T00:28:21+5:30
धुळे, जळगाव मनपा : भविष्य निर्वाह निधी भरण्यास हलगर्जीपणा
सातपूर : वारंवार संधी देऊनही रोजंदारी आणि कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या धुळे, जळगाव, नंदुरबार व चाळीसगाव या नगरपालिका आणि महानगरपालिकांची बँक खाती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सील केल्याची माहिती निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली.
नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार व चाळीसगाव या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये रोजंदारीवर व कंत्राटी कामगार काम करतात. मात्र या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी वेळच्या वेळी भरणे गरजेचे असताना तो भरण्यात आला नाही. म्हणून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने या नगरपालिका आणि महानगरपालिकांना दप्तर सादर करण्यास सांगितले होते. याबाबत वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कारवाईची तंबी दिल्यानंतर अखेर दप्तर सादर करण्यात आले. या दप्तरावरून तेथील रोजंदारीवर व कंत्राटीवर काम करणाऱ्या कामगार रक्कम निश्चित करण्यात आली. सदर रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करण्यासाठी पुन्हा तगादा लावावा लागला, वेळोवेळी संधीही देण्यात आली. अखेर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला नियमाप्रमाणे या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांची बँक खाती सील करण्याची कायदेशीर कारवाई नाईलाजाने करावी लागल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली. (वार्ताहर)