नवीन मतदारांनी गाठला लाखाचा टप्पा
By admin | Published: October 20, 2016 02:21 AM2016-10-20T02:21:19+5:302016-10-20T02:22:40+5:30
शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद : शेवटचे दोन दिवस
नाशिक : पाच जानेवारी रोजी अंतिम प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शहरी भागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एक लाखाहून अधिक नवीन मतदारांनी नोंदणीचे अर्ज सादर केले आहेत. आयोगाने आठवडाभराची वाढवून दिलेली मुदत येत्या दोन दिवसांत संपुष्टात येणार असल्याने मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू केली असून, १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करण्याबरोबरच नाव, पत्त्यात बदल, मतदान केंद्र, मतदार संघातील बदल, नाव कमी करणे आदि सुविधा मतदारांना उपलब्ध करून दिल्या. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा फायदा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांनी उचलून जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष करून नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघात या मोहिमेत हजारोच्या संख्येने नवीन मतदारांचे अर्ज भरून देण्यात आले. राजकीय पक्षांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, राज्य आयोगाने या मोहिमेला आणखी एक आठवडा म्हणजे २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. जिल्ह्यात १८ आॅक्टोबर अखेर एक लाख २९३० इतके नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या दोन दिवसांत या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन मतदारांच्या अर्जांची छाननी केली जाणार असून, त्यात जवळपास दहा ते पंधरा टक्के मतदारांची नावे दुबार होण्याची शक्यता निवडणूक शाखेतील सूत्रांनी व्यक्त केली. या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मिळणार आहे. (प्रतिनिधी)