लोकधारेतून घडविले अनोख्या संस्कृतीचे दर्शन
By admin | Published: December 2, 2015 10:53 PM2015-12-02T22:53:16+5:302015-12-02T22:55:49+5:30
लोकधारेतून घडविले अनोख्या संस्कृतीचे दर्शन
नाशिक : जागरण गोंधळात रात्र सरली, गोंधळ मांडिला अंबा या राम वाणी आणि गणेश वाणी यांनी सादर केलेल्या जागरण गोंधळाने महाकवी कालिदास कलामंदिर येथे के. के. वाघ कला अकादमी प्रस्तुत कर्मवीर कला महोत्सवातील लोकधारा हा लोकनृत्यावर आधारित कार्यक्रमास उत्साहात सुरुवात झाली.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे सुरू असलेल्या या महोत्सवात बुधवारी (दि. २) लोकधारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला शुभांगी साळवे आणि सहकाऱ्यांनी वासुदेवाची स्वारी या लोकनृत्याचे सादरीकरण करून महाराष्ट्राला लाभलेल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, तसेच प्रसन्न हो शंकरा या गीतातून शिवभक्तीचे यथार्थ दर्शन घडविले. कार्यक्रमात पुढे वासुदेव नृत्य, पारधी नृत्य, जोगवा, कोळी नृत्य, गोंधळ, तारपा आदि लोकनृत्याचा आविष्कार दाखविण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस रोहिणी भुसे आणि ऋ तुजा चव्हाणके यांनी अप्रतिम संबळ वादन करून उपस्थितांची दाद मिळविली. सूत्रसंचालन आशिष रानडे यांनी, तर आभार प्रा. मक रंद हिंगणे यांनी मानले. दरम्यान, गुरुवारी (दि. ३) के. के. वाघ कॉलेज आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यातर्फे ‘फ्युजन’ तर पं. शंकर वैरागकर यांच्या गायनाचे सादरीकरण होणार आहे. (प्रतिनिधी)