कांदा उत्पादक संघटनेचे मंत्र्यांना फोन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:31 AM2020-07-27T00:31:49+5:302020-07-27T00:32:09+5:30
राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा. यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने २८ जुलैला मंत्र्यांना फोन आंदोलन पुकारले आहे.
नाशिक : राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा. यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने २८ जुलैला मंत्र्यांना फोन आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी मंगळवारी (दि.२८) सकाळी ९ वाजल्यापासून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आपापल्या जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्री यांनाही कांदाप्रश्नी शेतकरी स्वत: फोन करून कांद्याच्या थेट खरेदीच्या मागणीसाठी विनंती करणार आहेत.
संचारबंदी व वाढत्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणे शक्य नसल्याने कांदाप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी फोन आंदोलनाचा मार्ग निवडला असल्याची माहिती यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.