नाशिकात देवेंद्र फडणवीसांचा फोटो फाडला; मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन
By धनंजय रिसोडकर | Published: September 2, 2023 02:41 PM2023-09-02T14:41:06+5:302023-09-02T14:41:34+5:30
जालन्यातील घटनेचे पडसाद नाशिकमध्येदेखील उमटले आहेत. शहरातील सीबीएस परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते मेहेर सिग्नल या भागात सकल मराठा समाज तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून शनिवारी (दि. ०२) मराठा समाजाकडून या घटनेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. नाशकातही सीबीएस परिसरात दोन संघटनांच्या माध्यमातून युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत तसेच देवेंद्र फडणवीस यांचा फोटो फाडण्यासह फडणवीस आणि राज्य शासनविरोधी घोषणा देत शासनाचा निषेध केला.
जालन्यातील घटनेचे पडसाद नाशिकमध्येदेखील उमटले आहेत. शहरातील सीबीएस परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते मेहेर सिग्नल या भागात सकल मराठा समाज तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधातदेखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दुटप्पी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या तरूणांनी आंदोलकांनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. तसेच जालना जिल्ह्याच्या एसपींना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तातडीने घेण्याची मागणीदेखील करण्यात आली. प्रफुल्ल वाघ, नितीन रोटे पाटील, सागर देशमुख यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांना सरकारवाडा पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.