बाजार समितीत फिजिकल डिस्टन्सिंग फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 06:34 PM2020-07-13T18:34:02+5:302020-07-13T18:50:53+5:30
पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समितीने विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या ...
पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समितीने विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या सूचना मनपाने दिल्या. तरीदेखील प्रत्यक्षात बाजार समितीकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येक शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती घटकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, अशी सूचना देऊनही नियमांची पायमल्ली केली जात आहे.
बाजार समितीकडून प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले सॅनिटायझर्स कक्ष बंद करण्यात आले आहे. बाजार समितीत गर्दी टाळण्यासाठी हमालांना वेळ ठरवून देत त्यांना गणवेश देण्यात यावे, असे सुचविले होते. परंतु अद्याप हमालांना गणवेश दिलेले नाही. येथे शेतमाल घेऊन येणाºया वाहनात केवळ दोन-तीन शेतकरी असावे असे असले तरी प्रत्यक्षात चारपेक्षा जास्त लोक वाहनात बसलेले असतात. त्यातच प्रवेशद्वारावर येणा-या प्रत्येक व्यक्तीचे तापमान मोजणे बंधनकारक करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी नियमितपणे होत नाही. येथे प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले खरे, मात्र अनेकजण मास्क लावत नसल्याचे दिसून येते तर शेतमालाचे व्यवहार बाजार समिती बाहेर मोकळ्या जागेत घ्यावे, यावर उपाययोजना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने सुचविले होते. मात्र बाजार समितीने आम्हाला बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येत नाही असे स्पष्ट करत मोकळ्या जागेत व्यवहार करण्याच्या विषयाला बगल दिली आहे. बाजार समितीत दैनंदिन शेकडो शेतकरी, व्यापारी, हमाल यांची वर्दळ असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असले तरी खुद्द बाजार समिती उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप काही संचालकांनी तसेच व्यापारी आणि बाजार समिती घटकांनी केला आहे.