तळवाडे येथे विहिरीत पडला बिबट्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:02 PM2018-09-30T18:02:09+5:302018-09-30T18:03:09+5:30
निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे ,महाजनपुर या दोन गावांच्या सीमेवर विठ्ठल गवते यांच्या गट नंबर ३५४७ येथील विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात यश आले.
निफाड तालुक्यात महाजनपुर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी या गावांमध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. एका महिन्यात महाजनपुर शिवारात एकाच ठिकाणी चार बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले असले तरी आणखी बिबटे असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी पाहिले आहे. दहा दिवसांनंतर तळवाडे आणि महाजनपुर शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास गवते यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले. त्यांनी सरपंच लता सांगळे यांना कळविल्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास कर्मचारी पिंजºयासह दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यास यश आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी टेकनर, शेख यासह महाजनपूरचे सरपंच आशा फड, राजेंद्र सांगळे व शेतकरी उपस्थित होते.