नायलॉन मांजाच्या फासातून कबुतराची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:50+5:302021-01-18T04:13:50+5:30
नायलॉन मांजाचा वापर शहरात बंद झाला असे नाही, तर याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र शहराच्या काही भागामध्ये अजूनही ...
नायलॉन मांजाचा वापर शहरात बंद झाला असे नाही, तर याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र शहराच्या काही भागामध्ये अजूनही नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे केला जात असल्याने संताप व्यक्त हाेत आहे. येथील नारळाच्या झाडावर एक जिवंत कबुतर नायलॉनच्या मांजात अडकून तडफडत होते. ही बाब येथील रहिवासी स्वप्निल जोशी यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविली. माहिती मिळताच फायरमन अविनाश सोनवणे, संजय गाडेकर, कांतिलाल पवार, बंबचालक इस्माईल काजी यांनी धाव घेतली. येथील दुसऱ्या बंगल्याच्या गच्चीवर जाऊन बांबूच्या आकडीचा वापर करीत नायलॉन मांजा अलगदपणे फांदीवरुन खाली खेचला. यावेळी त्यासोबत कबुतरही जवानांच्या हाती सुखरूप आले. जवानांनी मांजाचे वेटोळे कापले आणि कबुतराने पुन्हा आकाशात भरारी घेतली.
----