रहिवासी क्षेत्रात फटाका विक्रीविरुद्ध जनहित याचिका
By admin | Published: October 28, 2015 11:59 PM2015-10-28T23:59:47+5:302015-10-29T00:08:10+5:30
रहिवासी क्षेत्रात फटाका विक्रीविरुद्ध जनहित याचिका
नाशिक : शहरामध्ये सर्रासपणे रहिवासी क्षेत्रामध्ये फटाका विक्री व साठा केला जात असून स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याविरुद्ध कोणत्याही उपाययोजना पोलीस, महापालिका प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने चंद्रकात लासुरे यांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
राज्यात फटाके दुकाने, फटाका गुदाम, कारखाना व काही फटाके यांच्यावर स्फोटक, ज्वालाग्राही कायद्याप्रमाणे असलेल्या नियमांचे व्यावसायिकांकडून उल्लंघन केले जात असल्याचे लासुरे यांनी म्हटले आहे. संबंधित महापालिका व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. शहरात भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिकपणे अनधिकृतरीत्या फटाके व स्फोटक वस्तूंची विक्री दिवाळीच्या कालावधीमध्ये खुलेआम केली जात असल्याचे म्हटले आहे. ईदगाह मैदानावर फटाका विक्रीच्या दुकानांना बंदी आहे. कारण मैदानाला लागूनच शासकीय विश्रामगृह, जिल्हा रुग्णालय, धार्मिक वास्तू आहे. त्यामुळे या मैदानावर विक्रेत्यांना बंदी घालण्यात यावी, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)