जुने नाशिकमधील बडी दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:23 AM2018-08-28T01:23:21+5:302018-08-28T01:23:57+5:30
राज्य शासनाच्या ‘क’ दर्जाच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या यादीत जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा नियोजन विकास मंडळामार्फत भविष्यात दर्ग्याच्या परिसरात आवश्यक ती विकासकामे करण्याचा मार्ग खुला झाला असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.
नाशिक : राज्य शासनाच्या ‘क’ दर्जाच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या यादीत जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा नियोजन विकास मंडळामार्फत भविष्यात दर्ग्याच्या परिसरात आवश्यक ती विकासकामे करण्याचा मार्ग खुला झाला असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. जुन्या नाशकातील ऐतिहासिक बडी दर्गा हा सुमारे ३८९ वर्षे जुना आहे. या दर्ग्याच्या परिसरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. दरवर्षी बकरी ईदनंतर हुसेनी बाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक संदलचा उत्सव साजरा केला जातो. तसेच उन्हाळी शालेय सुटीच्या कालावधीत यात्रोत्सवही आयोजित केला जातो. जुने नाशिकसह संपूर्ण शहर व परिसरातून भाविक मोठ्या श्रध्देने बडी दर्गामध्ये हजेरी लावतात. गुरुवारी व शुक्रवारी भाविकांचा ओघ वाढलेला असतो. या पार्श्वभूमीवर ‘क’ गटातील धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या यादीत बडी दर्ग्याला स्थान मिळाले आहे. फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बडी दर्गा परिसराचे सुशोभिकरण व विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी मागितला आहे.