पावसाअभावी बळीराजा हवालदिल
By admin | Published: July 3, 2014 09:30 PM2014-07-03T21:30:38+5:302014-07-04T00:17:16+5:30
पावसाअभावी बळीराजा हवालदिल
घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात तीन महत्त्वाची नक्षत्रे उलटूनही पावसाने आगमन न केल्याने लागवडीसाठी पेरणी केलेली भाताची रोपे जळण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. कधी एकदा पाऊस बरसेल आणि कधी भाताची लागवड होईल या विचाराने तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पाऊस लांबणीवर पडल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरी, नद्या-नाले आटल्याने कोरडेठाक पडले आहेत, तर सर्व प्रमुख धरणांनी तळ गाठला असल्याचे भयाण चित्र इगतपुरी तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
सुरुवातीच्या काळात झालेल्या वादळी पावसाच्या पाण्यावर तालुक्यात शेतकऱ्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत याच पाण्याच्या भरवशावर भाताच्या पेरण्या केल्या होत्या. आता दमदार पाऊस होईल या अपेक्षेवर जमिनीच्या पोटात टाकलेले धान्य काही दिवसातच कोम धरून वर आले; परंतु त्यानंतर मात्र पावसाने सर्वत्र पाठ फिरविली. हळूहळू पाण्याअभावी या रोपाची वाढ खुंटली आणि उन्हाच्या तडाख्याने ही पिके जळू लागली.
काही शेतकऱ्यांनी मात्र ही रोपे वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत जवळील धरण, नदी-नाले, विहिरी यांचे पाणी भरले; परंतु कालांतराने पाण्याचे हे स्रोत आटू लागले. यावरही मात करीत
काही शेतकऱ्यांनी पाण्याच्या टॅँकरने ही
रोपे वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
मागील वर्षी १५ जूनपर्यंत सर्वत्र भात लावणी पूर्ण झाली होती. यावर्षी जून उलटून गेला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहेत. तालुक्यातील विहिरी, धरणे,
नद्या यांनीदेखील तळ गाठल्याने
पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांना चाराही नाही, अशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईने गंभीर रूप धारण करीत अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असताना मात्र
इगतपुरी पंचायत समिती याकडे दुर्लक्ष आणि काणाडोळा करीत असल्याने
अनेक गावांतील महिला पाणी कुठून मिळवावे या विवंचनेत आहेत. याबाबत स्थानिक ग्रामसेवकाकडे कैफियत मांडल्यानंतर ग्रामसेवकही दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)