पिंपळगाव खांब मलनि:सारण केंद्रासाठी विरोध डावलून जागेचे संपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:31 AM2017-11-23T00:31:02+5:302017-11-23T00:34:22+5:30
पिंपळगाव खांब येथे महापालिकेने मलनि:सारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या संपादन प्रक्रियेला बाधित शेतकºयांचा असलेला विरोध डावलून त्यांना ताब्यात घेत पोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन करण्यात आले. उर्वरित पावणेदहा एकर जागा संपादनास उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याने तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली.
नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे महापालिकेने मलनि:सारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या संपादन प्रक्रियेला बाधित शेतकºयांचा असलेला विरोध डावलून त्यांना ताब्यात घेत पोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन करण्यात आले. उर्वरित पावणेदहा एकर जागा संपादनास उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याने तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली.
पिंपळगाव खांब येथे मलनि:सारण केंद्रासाठी सन २००७ मध्ये महापालिकेने जागा संपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव दिला होता. पिंपळगाव खांब येथील गट क्र. २ मध्ये सव्वातीन एकर (१.३ हेक्टर) व गट क्र. ६३ मध्ये पावणेदहा एकर (३.९ हेक्टर) अशा एकूण साडेबारा एकरवर मलनि:सारण केंद्राचे मनपाने आरक्षण टाकले होते. सदर प्रकल्पासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी बाधित होणार होत्या त्यांनी त्यास कडाडून विरोध केला होता. मनपाने टाकलेल्या आरक्षणाच्या विरोधात शेतकºयांनी उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केलेली आहे. या आरक्षित जागेची काही वर्षांपूर्वी मोजणी करतानादेखील तीव्र विरोध झाल्याने वाद निर्माण झाला होता. भूसंपादन विभाग-२ च्या उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार राजश्री अहिरराव, मंडळ अधिकारी बी. आर. कसबे, तलाठी एस. के. शिंदे, मनपा मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, मनपा अधीक्षक अभियंता संजय घुगे आदी अधिकारी, कर्मचारी कडेकोट पोलीस बंदोबस्तासह बुधवारी (दि. २२) सकाळी १०.३० च्या सुमारास पिंपळगाव खांब येथे मलनि:सारण केंद्राची आरक्षित जागा संपादनासाठी गेले होते. यावेळी बाधित शेतकºयांनी जागा संपादनास कडाडून विरोध केल्याने वाद निर्माण झाला. गट क्र. ६३ मधील प्रभाकर बोराडे, दीपक बोराडे, सुरेश बोराडे, भिवाजी बोराडे, दत्तू बोराडे, विश्वास बोराडे, हेमंत बोराडे आदी शेतकºयांनी जागा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेचा निकाल लागला नसून आम्ही कुठलाही मोबदला घेतलेला नाही, असे सांगत विरोध दर्शविला. तरीदेखील गट क्र. ६३ मध्ये कुंपण घालण्यासाठी खड्डे करून सीमेंटचे खांब रोवण्यात आले. मात्र शेतकºयांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याचे सांगून काही वेळाने आॅर्डर देऊ असे सांगितल्यानंतर तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली. कुंपणासाठी खड्डे करताना शेतात गाड्या घुसविल्याने शेतमालाचे नुकसान झाल्याचा आरोप यावेळी शेतकºयांनी केला.
शेतकºयांच्या मागण्या अन् वाद
गट क्रमांक २ मधील शेतकºयांनी पैसे मिळाल्यानंतर भूसंपादनास संमतीपत्र लिहून दिल्यानंतर काही अटी मान्य झाल्या नाहीत म्हणून जागा संपादित करण्यास तीव्र विरोध केला. महादू भिवा बोराडे, भिवा नामदेव बोराडे, प्रेमा गोपाळ बोराडे, लीलाबाई प्रेमा बोराडे, राजेंद्र शिवराम बोराडे यांच्या गट क्रमांक २ मधील सव्वातीन एकर (१३ हजार चौरस मीटर) जागेकरिता पाच कोटी ३७ लाख रुपये संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, त्यांनी संमतीपत्रदेखील लिहून दिल्याचे भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांनी सांगितले. मात्र संबंधित शेतकºयांनी आमच्या काही अटी मान्य झाल्या नाहीत, योग्य मोबदला दिला नाही, मुलांना मनपामध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांवरून भूसंपादन प्रक्रियेला तीव्र विरोध केल्याने खूप वेळ वादविवाद सुरू होता. अखेर पोलिसांनी विरोध करणाºयांना ताब्यात घेऊन गट क्र. २ मधील भूसंपादनाची प्रक्रिया सायंकाळपर्यंत पार पाडली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक आदींचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.