पिंपळगाव खांब रस्ता दुरु स्तीच्या कामास सुरु वात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:26 AM2019-07-09T00:26:28+5:302019-07-09T00:27:11+5:30
पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते,
इंदिरानगर : पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते, या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरु वात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपळगाव खांब हे गाव शेतकरी व कामगार वस्ती म्हणून ओळखले जाते. सुमारे चार हजार लोकांची वस्ती आहे. गावातील विद्यार्थी वर्ग, शेतकरी व कामगार यांना शहरात ये-जा करण्यासाठी पिंपळगाव खांब ते पिंपळगाव खांब फाटा मुख्य रस्ता आहे. परंतु सुमारे तीन महिन्यात पूर्वी पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब या रस्त्याचे खोदकाम करून भूमिगत गटारीसाठी पाइपलाइन टाकण्यात आली आणि रस्ता वरवर बुजविण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सदर रस्ता पावसाच्या पाण्यामुळे खचून गेला आणि ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वाहतुकीचा रस्ता बंद झाला असल्याने सुमारे चार मीटरचा फेरा मारून वडनेरगावमार्गे ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मनपाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत सोमवारी (दि. ८ ) पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब या खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.