पिंपळगाव- घोटी-भंडारदरा रस्ता खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 07:00 PM2019-11-17T19:00:52+5:302019-11-17T19:01:22+5:30
नाशिक व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा घोटी-पिंपळगाव मोर-भंडारदरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
सर्वतीर्थ टाकेद : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा घोटी-पिंपळगाव मोर-भंडारदरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. राज्यातील सर्वोच्च शिखर कळसूबाई, हरिश्चंद्र गड, किल्ले विश्रामगड, सर्वतीर्थ टाकेद, रतनगड, किल्ले कलंग, अदन, मदन, उलंग, रंध्रा फॉल, घोरपडादेवी, भंडारदरा धरण येथे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यावरणप्रेमी व पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यात घोटी-सिन्नर महामार्गाची चाळण झाली असून, घोटी-भंडारदरा रस्त्यावरील प्रवास प्रवासी व वाहनचालकांना मोठी डोकेदुखी ठरत आहे. पिंपळगाव मोरपासून ते धामणीची वाडी-परदेशवाडी-
वासाळी फाटा ते बारीपर्यंत रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडला आहे.
इगतपुरी, घोटीसह परिसरातील एकमेव बाजारपेठ असलेल्या तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद या ठिकाणी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना, व्यापारी-दुकानदारांसह पर्यटक व भाविकांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहे. गरोदर महिला, रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागतो आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.