पिंपळगावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:39 PM2021-04-01T22:39:47+5:302021-04-02T01:06:11+5:30
पिंपळगाव बसवंत : मार्चअखेरची हिशोब तपासणी, कोरोनाचा प्रादुर्भाव व सण आणि साप्ताहिक सुट्या या अनुषंगाने दि.२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बाजार समितीत लिलाव बंद ठेवण्यात आला असून, यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, या सात दिवसांत पिंपळगाव बाजार समितीला कोटींचे नुकसान सहन करावे लागणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली असून, कांदा लिलाव आवारात शुकशुकाट दिसत आहे.

मार्चअखेर विविध सण आणि साप्ताहिक सुटीनिमित्त पिंपळगाव बाजार समितीतील कांदा व धान्य लिलावाचे कामकाज सुमारे सात दिवस बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. मार्च महिना संपुष्टात येत असून, लाल कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यातच कोरोनाचा कहर वाढल्यामुळे कांद्याच्या बाजार भावातही मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखणे व मार्चअखेरच्या हिशोब तपासणीबाबत बाजार समिती आवारात लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी, या बंदने कोट्यवधींचा तोटा बाजार समित्यांना सहन करावा लागणार आहे. येत्या काळात बाजारभावातही कमालीची घसरण होणार असल्याने शेतकरी वर्गाने संताप व्यक्त केला.
बेदाणा, भाजीपाला, द्राक्षमणी आदीसह इतर मार्केट व्यवस्थित सुरू आहे. फक्त मार्चअखेर गुडफ्रायडे, होळी व साप्ताहिक सुट्या असल्याने कांदा लिलाव प्रक्रिया बंद आहे. या बंदमुळे सरासरी साधारण ३० ते ४० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मात्र, येत्या ५ एप्रिलला लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू होणार आहे.
-रामभाऊ माळोदे, संचालक, पिंपळगाव बाजार समिती
मार्चअखेर व बँकांच्या सुट्या आणि होळीच्या सणामुळे दरवर्षीप्रमाणे लिलाव प्रक्रिया बंद असते आणि याचा मार्केटवर कोणताही परिणाम होत नाही. पाच तारखेला लिलाव प्रक्रिया सुरळीत होणार आहे.
-अनुप थोरात, व्यापारी, पिंपळगाव बसवंत
व्यावसायिकांकडून कांद्याच्या मागणीला ब्रेक
हॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याच्या मागणीला प्रचंड प्रतिसाद असतो. जवळपास एक हॉटेल व्यावसायिक वर्षभरात एक ट्रक कांदा आयात करतो. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता व टाळेबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट व भावातदेखील कमालीची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.