पिंपळगावी पोलिसांचा बेफिकीर नागरिकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:48+5:302021-05-01T04:13:48+5:30
पिंपळगाव बसवंत : जनता कर्फ्यू असतानाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, काही नागरिकांना त्याचे ...
पिंपळगाव बसवंत : जनता कर्फ्यू असतानाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, काही नागरिकांना त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. त्यामुळे अशा बेफिकीर नागरिकांना धडा शिकवण्यासाठी पिंपळगाव पोलीस, आरोग्य आणि ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून, कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणताही दंड न करता, अशा नागरिकांची थेट ऑन दी स्पॉट कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह निघाल्यास थेट रवानगी विलगीकरण कक्षात केली जात असल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. या कारवाईत ३२ नागरिकांची चाचणी करण्यात आली असता, त्यात तिघेजण पॉझिटिव्ह आढळले.
पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या काही दिवसांपासून कारोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, किराणा दुकानदार, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यात झालेल्या बैठकीत दहा दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. तरीही नागरिक विनाकारण गावात फिरताना आढळत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने निफाड फाटा परिसरात शुक्रवारी (दि. ३०) ऑन दी स्पॉट कोरोना चाचणी ही मोहीम राबविण्यात आली. या चाचणीमध्ये ३२पैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने त्यांना कोरोना विलगीकरण कक्षात पाठविले आहे.
पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्यासह जयश्री सोनवणे, दुर्गेश बैरागी,पंडित वाघ, संदीप दराडे, राकेश धोंगडे, प्रकाश रिकामे आदी या कारवाईत सहभागी झाले होते.
कोट ......
आरोग्य विभागाच्या मदतीने पिंपळगाव बसवंत शहरात अँटिजेन चाचणी सुरू केली आहे. यात बेफिकीरपणे गावात फिरणाऱ्या नागरिकांना पकडून ऑन दी स्पॉट त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची थेट कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी केली जात आहे. जेणेकरून पॉझिटिव्ह रुग्ण विलगीकरण कक्षात गेल्याने त्यांच्यापासून होणाऱ्या संसर्गाला आळा बसेल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक
फोटो- ३० पिंपळगाव बसवंत
===Photopath===
300421\30nsk_24_30042021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० पिंपळगाव बसवंत