बुधवारपासून पिंपळगावला ‘टोल’धाड
By admin | Published: November 14, 2015 11:09 PM2015-11-14T23:09:49+5:302015-11-14T23:10:31+5:30
अवजड वाहनांना भुर्दंड : सहमतीसाठी बैठकीचे आयोजन
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर येत्या बुधवारपासून मोठ्या अवजड (सहा व त्यापेक्षा अधिक टायर असलेल्या) वाहनांच्या टोलमध्ये वाढ लागू करण्यात येणार असून, स्थानिक ग्रामस्थ तसेच जिल्हावासीयांच्या अवजड वाहनांना देण्यात आलेली यापूर्वीची सवलतही काढून घेण्यात येणार असल्याने महामार्गावरील ‘टोलधाड’ अटळ मानली जात आहे.
पिंपळगाव येथील पिएनजी कंपनीने गेल्या आठवड्यात नोटीस काढून सर्व प्रकारच्या वाहनांच्या टोलमध्ये सोमवार, दि. १५ च्या मध्यरात्रीपासून वाढ करण्याचे जाहीर केले होते, त्याच्या विरोधात पिंपळगावच्या ग्रामस्थांनी दुसऱ्याच दिवशी टोलनाक्यावर आंदोलन करून टोल बंद पाडल्याने या संदर्भात तोडगा काढण्यासाठी निफाड तहसीलदार, टोल व्यवस्थापन व ग्रामस्थांची बैठक होऊन सोमवारपासून लागू होणाऱ्या दरवाढीवर सहमतीने तोडगा काढण्याचे व तोपर्यंत वाढ न करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामुळे सोमवारपासून लागू होणारी दरवाढ तूर्त टळली असली तरी, मंगळवारी या संदर्भात निफाड तहसीलदार संदीप अहेर यांनी टोल व्यवस्थापन, स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलविली असून, त्यात टोल व्यवस्थापन टोल वाढीबाबतचे त्यांचे म्हणणे मांडणार आहे.
तत्पूर्वी पीएनजी कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन टोलवाढीबाबत चर्चा केली होती, मे २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक व जिल्ह्यातील वाहनांना दिलेली टोल सवलत कायम ठेवायची की काढायची यावर विचार विमर्ष करण्यात आला.
तहसीलदारांनी बोलविलेल्या मंगळवारच्या बैठकीत टोलवाढीबाबत चर्चा करण्यात येऊन बुधवारपासून वाढीव टोलवसुली सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात मल्टी एक्सेल व्हेईकल म्हणजेच सहा किंवा त्यापेक्षा अधिक टायर असलेल्या वाहनांच्या टोलमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यात साधारणत: ट्रेलर, कंटेनर, मोठ्या ट्रक्सचा समावेश असेल त्यांना साधारणत: एकेरी फेरीसाठी ६९० ते ८९० रुपये भुर्दंड बसणार आहे. पहिल्या टप्प्यातील टोल वाढीनंतर टप्पाटप्प्याने अन्य वाहनांसाठी टोल वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.