‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपळगावची दुसऱ्यांदा बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 01:56 AM2022-06-06T01:56:14+5:302022-06-06T01:58:28+5:30

माझी वसुंधरा अभियान टप्पा-२अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून आपले कर्तव्य पार पडावे तसेच महाराष्ट्र राज्य हरित करण्यासाठी हा कार्यक्रम व्यापक करावा. त्यासाठी आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

Pimpalgaon's second victory in 'Majhi Vasundhara' campaign | ‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपळगावची दुसऱ्यांदा बाजी

‘माझी वसुंधरा’ अभियान टप्पा-२अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका बनकर, उपसरपंच बापू कडाळे. समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामपालिकेचे सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदी.

Next

पिंपळगाव बसवंत : माझी वसुंधरा अभियान टप्पा-२अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून आपले कर्तव्य पार पडावे तसेच महाराष्ट्र राज्य हरित करण्यासाठी हा कार्यक्रम व्यापक करावा. त्यासाठी आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

पर्यावरणदिनानिमित्त रविवारी (दि. ५) मुंबई येथील नरिमन पाॅईंटजवळील टाटा थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, राजशिष्टाचार व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अलका बनकर, उपसरपंच बापू कडाळे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे आणि ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत पिंपळगाव ग्रामपालिकेने यापूर्वीही सहभाग नोंदवित राज्यात प्रथम पुरस्कारासह दीड कोटींचे पारितोषिक पटकावले होते. स्पर्धेत पिंपळगाव ग्रामपालिकेने दुसऱ्यांदा सहभाग नोंदवित शहरात अभिनव उपक्रम राबविले. या उपक्रमाची दखल घेऊन राज्यातील ग्रामपंचायत गटातून पिंपळगाव ग्रामपालिकेची निवड करण्यात आली.

पिंपळगाव ग्रामपालिकेने या अभियानात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. यात निसर्ग वाचवा, गुलाबी गाव संकल्पना, पुस्तकाचे गाव, चिमण्यांची भिंत, कबुतर खाना, पाणी बचत, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, उद्याने, व्यायामशाळा, वार्ड सुशोभीकरण, स्मार्ट स्मशानभूमी, ओझोन पार्क, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण तसेच लहान मुलांसाठी बगिचा, नाना-नानी पार्क आदी उपक्रमांचा समावेश होता. पिंपळगाव ग्रामपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज पाच लाख लिटर पाणी वाया जात होते. नवीन जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणी शुद्ध करून वापरात आणले गेले. तसेच ४० वर्षांपासून साचलेल्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले. पर्यावरणाचा समतोल साधून घनकचरा व्यवस्थापन, गावाची स्वच्छता याअंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वाचे संरक्षण व संवर्धन केले. त्यामुळे या नावीन्यपूर्ण उपक्रमातून पिंपळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडली.

कोट.....

शासनाच्या सर्वनियमांचे पालन करीत नागरिकांच्या पुढाकारातून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि लोकप्रतिनिधीच्या सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी झाले. त्यामुळे ग्रामपालिकेला दुसऱ्यांदा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून, पिंपळगाव शहराच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

- अलका बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

 

 

 

Web Title: Pimpalgaon's second victory in 'Majhi Vasundhara' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.