पिंपळगाव जलाल शाळेत शिक्षकांत हाणामारी
By admin | Published: July 9, 2017 12:14 AM2017-07-09T00:14:17+5:302017-07-09T00:14:34+5:30
येवला : जिल्हा परिषदेच्या शाळेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकाला शिक्षकाने मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकाला शाळेतीलच एका शिक्षकाने सहविचार सभेत मुख्याध्यापकांसमोर शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना कळताच संतप्त ग्रामस्थांनी आदर्श शिक्षकाची बाजू घेत शाळेला कुलूप ठोकले.
मुख्याध्यापक मोहन सावंत यांनी आपल्या दालनात सकाळी ८.३० वाजता सहविचार सभा बोलावली होती. बैठकीत शाळेतील शिक्षक राम जावरे यांनी शाळेच्या वेळेसंदर्भात विषय घेतला. शालेय कामकाजासाठी संगणकावर जो पासवर्ड टाकला आहे, त्या संदर्भात उपशिक्षक जावरे यांनी राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाळ यांना शिवीगाळ करीत मुख्याध्यापकांच्या दालनात मीटिंगमध्येच जोरदार मारहाण केली. यामुळे संतप्त होत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. ग्रामस्थांनी या घटनेसंदर्भात तालुक्यातील लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी यांना माहिती दिली. गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी मंदाकिनी लाडे यांना या शाळेवर पाठविले. लाडे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थांकडे घटनेसंदर्भात चौकशी केली. शिक्षकांनी अशी वर्तणूक करू नये, असे सांगत दोषींना शासन देऊ, असे आश्वासन देत ग्रामस्थांना शाळेचे कुलूप काढण्याचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी जोपावेतो मुख्याध्यापक सावंत व उपशिक्षक जावरे या दोघांची बदली होत नाही, तो पावेतो शाळेचे कुलूप न काढण्याची भूमिका घेतली. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांनी शाळेबाहेर उपस्थित ग्रामस्थ व शिक्षकांची भेट घेतली.