पिंपरी संघ विजेता तर ठाणे उपविजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:27 PM2018-11-15T18:27:02+5:302018-11-15T18:27:38+5:30
६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
देवळा : येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
कर्मवीर माजी आमदार डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६४ वी सिनियर महाराष्ट्र राज्य बॉल- बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धा देवळा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत रंगतदार व चुरशीचे सामने प्रेक्षकांना बघावयास मिळाले. २५ संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत चंद्रपूर, नाशिक ग्रामीण, वर्धा, पुणे, रायगड, ठाणे, लातूर, पिंपरी चिंचवड या आठ संघांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचे सामने ठाणे विरुद्ध चंद्रपूर व पिंपरी चिंचवड विरुद्ध लातूर या संघात खेळला गेला. पिंपरी चिंचवड व ठाणे या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघावर मात करत विजेतेपद संपादन केले.
यावेळी बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बॉल बॅटमिंटन असो. सचिव सुरेश बोंगाडे, मुंबई असो. अध्यक्ष पी. हनुमंतराव, नाशिक ग्रामीण असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी अहेर, अशोक अहेर, नगरसेवक प्रदीप अहेर, प्राचार्य सतीश बच्छाव, सुनील भामरे आदी यावेळी उपस्थित होते. विजेत्या पिंपरी चिंचवड संघाला चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे आयोजन नाशिक ग्रामीण बॉल बॅटमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी नाशिक ग्रामीण असो. सचिव तुषार देवरे, पवन देवरे, नितीन देवरे, ईश्वर वाघ, सुनील देवरे, प्रदीप अहेर, दिलीप गुंजाळ, सौगत दत्ता, मनीष हिंगोले, प्रा. नितीन गुंजाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेत नाशिक ग्रामीण व लातूर यांच्यात झालेला उपउपांत्य फेरीचा सामना सर्वाधिक वेळ चालला. खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी पाहत तीन तास चाललेल्या या सामन्यात लातूर संघाने बाजी मारली. सूत्रसंचालन ईश्वर वाघ यांनी केले. संभाजी अहेर यांनी आभार मानले.