पिंगळा आला महाद्वारीं, भविष्यवाणी ऐका खरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:20+5:302021-08-24T04:18:20+5:30

चांदोरी : पिंगळा महाद्वारीं, बोली बोलतो देखा शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका डुग डुग ऐका डुग डुग ऐका... ...

Pingala Aala Mahadwari, listen to the prophecy! | पिंगळा आला महाद्वारीं, भविष्यवाणी ऐका खरी!

पिंगळा आला महाद्वारीं, भविष्यवाणी ऐका खरी!

चांदोरी :

पिंगळा महाद्वारीं, बोली बोलतो देखा

शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका

डुग डुग ऐका डुग डुग ऐका...

भविष्यात डोकावण्याचे वेगवेगळे मार्ग, पद्धती या माणसाच्या भौतिक विकासाबरोबर बदलत गेल्या. इंटरनेटवर ज्योतिषाचे दुकान मांडून बसलेले ज्योतिषी आणि पोपटवाला ज्योतिषी शहरात बघायला मिळतात. मार्ग कुठले का असेनात, मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना! भविष्यात काय वाढून ठेवलंय? लोकसाहित्य, कला, संस्कृती यात त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. पिंगळा हा लोककलाप्रकारही भविष्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. पूर्वी अनेक लोक भविष्य पाहण्यासाठी पिंगळ्याचा आधार घेत असत. पिंगळ्याने वर्तविलेले भविष्य खरेच होते, अशी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती व ती आजही तशीच असली तरी, पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे.

डमरूचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सूर्योदयाच्या वेळी पारंपरिक गाणी, अभंग म्हणत जाणारा कुडमुडे जोशी समाजातील पिंगळा बांधव चांदोरी परिसरात सध्या फिरत आहे. वासुदेव, वाघ्या, नंदीबैलवाला, बहुरूपी, भुत्या यांच्याच मालिकेतला हा पिंगळा. गळ्यात कवड्याची माळ, देवाचा टाक (चांदीच्या पत्र्यात कोरलेला छोटा देवाच्या चित्राचा ठसा), तबक, त्यात छोटी मूर्ती, गळ्यात एक छोटी झोळी, धोतर किंवा हल्ली लेंगा... असा हा पिंगळा सकाळी सकाळी एखाद्या घरात जाऊन काही तरी बोलतो आणि ते खरं होतं! त्याच्या जिभेवर म्हणे काळा तीळ असतो. एखाद्या घराच्या अंगणात जाऊन तो त्या घरातल्या माणसांच्या भवितव्याबद्दल काही तरी विधान करतो. ते भविष्य म्हणून गणले जाते. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये, म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा, धान्य आणि पैसे देतात. मग तो खूश होऊन आशीर्वादपर वक्तव्य करतो. लोक त्याच्या पाया पडतात; म्हणजे त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात. एखाद्या घरात कुणी फारशी दाद दिली नाही, तर देव वाईट करेल अशी भीती घालतो. रामप्रहरी असे शिव्याशाप कोण पदरी पाडेल? त्यामुळे काही तरी झोळीत पाडूनच तो पुढे जातो. रामप्रहर संपला की पिंगळा निष्प्रभ होतो. तो त्याच्या दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.

इन्फो

शाश्वत उत्पन्न नाही

पिंगुळ ही तशी नामशेष झालेली लोककला. आजच्या तरुण पिढीला तर माहीत नसलेला प्रकार आहे. या पिंगळा बांधवांची मुले शिकल्याने या व्यवसायात तरुण पिढी येत नाही. काळाच्या ओघात ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कायमस्वरूपी उत्पन्न नसल्याने या व्यवसायात कोणी येत नाही. पिढ्यान् पिढ्या चालत आलेली परंपरा कशी मोडीत काढायची, म्हणून हा व्यवसाय काही पिंगळे बांधव करीत आहेत. लोकांचे भविष्य सांगताना आपले भविष्य अंधारात असूनही पिढ्यान् पिढ्या चालत आलेली लोककला सांभाळत धन्यता मानणारे पिंगळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

इन्फो

पिंगळ्याची शिवकाळात मोठी भूमिका.

शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त पैसे मिळतात, असे पिंगळे बांधवांचे म्हणणे आहे. ते म्हणतात, शहरात सकाळी नऊशिवाय दरवाजा कोणी उघडत नाही. त्यामुळे दान कमी प्रमाणात मिळते. ग्रामीण भागात सूर्य उगवण्याच्या आतच कामाला सुरुवात होते. त्यामुळे पिंगळ्याला दान मिळते, असे ते म्हणतात. शिवकाळात या पिंगळ्याने मोठी भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो. स्वातंत्र्यपूर्व काळात हेरगिरीचे काम पिंगळ्याने केले. शत्रूच्या गटात काय चालले आहे, याची बितंबातमी शिवाजीराजांपर्यंत पोहोचविण्याचे काम यांनी केले. त्यामुळे या कलेला राजाश्रय होता, असे म्हटले जाते.

फोटो - २३ चांदोरी पिंगळा

चांदोरी परिसरात पिंगळा दाखल झाल्यानंतर पूजा करताना महिला.

230821\23nsk_16_23082021_13.jpg

फोटो - २३ चांदोरी पिंगळा चांदोरी परिसरात पिंगळा दाखल झाल्यानंतर पूजा करतांना महिला.

Web Title: Pingala Aala Mahadwari, listen to the prophecy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.