राज्यपालांच्या आगमनाने पसरले गुलाबी चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:07 AM2021-02-04T00:07:13+5:302021-02-04T01:06:16+5:30
श्याम खैरनार सुरगाणा : गुलाबी गाव म्हणून लौकिक असलेल्या सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आगमनामुळे अवघ्या ...
श्याम खैरनार
सुरगाणा : गुलाबी गाव म्हणून लौकिक असलेल्या सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आगमनामुळे अवघ्या गावात गुलाबी चैतन्य पसरले आणि ग्रामस्थांनी सडा-रांगोळी घालत, गुढ्या उभारत जणू दिवाळीच साजरी केली. राज्यपालांनीही या आदिवासी संस्कृतीशी आपली नाळ जोडली असल्याचे सांगत भरभरून कौतुक केले आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर चिंतन केले.
तालुक्यातील रोकडपाडा ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत असलेले गुलाबी गाव भिंतघर येथील आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीचे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले तसेच येथील गोशाळेचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोश्यारी यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना सांगितले की, मला आदिवासी संस्कृती आवडते. येथील लोक प्रकृतीने चांगले आहेत. मी नंदुरबारमध्ये गावातच राहिलो होतो. आदिवासी भागातील महिलांना केवळ सात किंवा दहा हजार रुपयांचे चेक देऊन फारसा उपयोग होणार नाही. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
शेतीसह सर्व कामे व्यवस्थित व्हावी यासाठी मी व सरकार प्रयत्न करत आहे. पेसा कायद्याअंतर्गत चांगले अधिकार दिले आहेत. पूर्वीपेक्षा आत्ताचा काळ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय धावपटू कविता राऊत व एवरेस्ट शिखर पादाक्रांत केलेली हेमलता गायकवाड या दोघींचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. स्नेहा शिरोळे यांनी केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे, जि. प. सदस्य कलावती चव्हाण, एन . डी. गावित, रोकड पाडा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच कांतीलाल खांडवी आदी उपस्थित होते.
वनपट्टा सातबारा लाभार्थ्यांना सुपूर्द
कार्यक्रमात वनपट्टा लाभार्थी तुळशीराम लहानु जाधव (भिंतघर), गुलाब पांडू वाघेरे(अंबोडे), बंसू काशिराम कडाळी(भिंतघर)या तीन आदिवासी मजुरांना वनपट्टा सातबारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी विमलबाई किसन जाधव (भिंतघर) यांना घरकुलाची चावी सुपुर्द करण्यात आली. .
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आमच्या गावात आल्याने खूप आनंद झाला. या गावात आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून हातसडीचा तांदूळ, आकाशकंदील, वनौषधी इत्यादी व्यवसाय करतो. त्यांच्या या दौऱ्यामुळे मार्केटिंगला वाव मिळून सर्व महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतीमालाला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.
- सविता जाधव, सखी महिला बचत गट
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणी, रस्ते, सपाटीकरण, शिक्षण, आरोग्य व्यवस्था यांचा समावेश आहे. आमच्या मागण्या पूर्ण होतील याची खात्री आहे.
- कांतीलाल कृष्णा खांडवी, सरपंच