पिंटू विटकरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:29+5:302021-03-07T04:14:29+5:30

जळगाव जिल्ह्यातील पहूरमधील एका स्टील उद्योगाच्या नावाने २० ते २५ कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला सुमारे ५०० कोटींपेक्षाही अधिक रकमांच्या ...

Pintu Vitkare sent to judicial custody | पिंटू विटकरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पिंटू विटकरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Next

जळगाव जिल्ह्यातील पहूरमधील एका स्टील उद्योगाच्या नावाने २० ते २५ कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला सुमारे ५०० कोटींपेक्षाही अधिक रकमांच्या बनावट पावत्यांचा घोटाळा उघडकीस आणण्यास जीएसटीच्या गुप्तचर पथकाला यश आले आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पिंटू याच्या पथकाने मुसक्या बांधल्या आहेत. वस्तू व सेवा कर विभागाकडे नोंदविलेल्या कारखान्यांच्या पत्त्यांवर चक्क औषधविक्रीची दुकाने सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे यंत्रणाही चक्रावून गेली आहे. ज्या जागेवर कंपनीच्या मुख्यालयाची नोंद जीएसटी विभागाला दाखविण्यात आली आहे, प्रत्यक्षात मात्र तेथे मुख्यालय नसून केवळ एक झोपडी असल्याचेही समोर आल्याने यंत्रणेलाही मोठा धक्का बसला. या घोटाळ्याची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. या गुन्ह्यातील तिघा फरार संशयितांचा शोध सुरू असून त्यांच्या मागावर पथके असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विटकरे हा यापूर्वी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीस होता. त्याने जीएसटीचे बारकावे जाणून घेत त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने हा बनावट पावत्यांचा कोट्यवधींचा घोटाळा घडवून आणल्याचे तपासात पुढे येत आहे. त्याचे अन्य दोन फरार साथीदार एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याशी संबंधित असल्याचेही बोलले जात आहे. दोघे जळगाव जिल्ह्यातील असून एक परजिल्ह्यातील आहे. लवकरच या तिघांनाही ताब्यात घेण्यास पथकांना यश येईल, असा विश्वास जीएसटी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, संशयित पिंटू याची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

---इन्फो--

स्टील उद्योग व कारखाने केवळ कागदावरच!

जळगाव जिल्ह्यात संशयित विटकरे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दाखविलेले स्टील उद्योगाचे कारखाने प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे कारखाने केवळ कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित विटकरे याने बनावट पावत्यांच्या आधारे सुमारे २३० कोटींचा जीएसटीचा घोटाळा घडवून आणल्याने केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Pintu Vitkare sent to judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.