पाईपलाईन रोड : नाल्यात कार कोसळल्याचे वृत्त झळकताच; बसविल्या संरक्षक जाळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:45 PM2018-04-03T16:45:20+5:302018-04-03T16:45:20+5:30
प्रशासनाने तत्परता दाखवत सदर ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवून धोका कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशिक : आज दुपारी बारा वाजेनंतर या अरुंद रस्त्यावरुन मार्गस्थ होणारी एक कार धोकादायक झालेल्या अपघाती स्थळावरुन नाल्याच्या पात्रात कोसळली. या अपघाताचे वृत्त लोकमत डॉट कॉम वेब न्यूज पोर्टलच्या संकेतस्थळावर तत्काळ सचित्र प्रसिध्द करण्यात आले. या वृत्तामधून धोकादायक नाल्याभोवती संरक्षक कठडे लावण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच हा रस्ता बहुतांश कॉलन्यांच्या अंतर्गत रस्त्याला जोडतो त्यामुळे वर्दळही असते, असे नमुद करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिध्द होताच महापालिका प्रशासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली. प्रशासनाने तत्परता दाखवत सदर ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवून धोका कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
भोसला मिलिटरी स्कूल-संतकबीरनरगरमार्गे मोतीवाला कॉलेज पाईपलाईनरोडला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्याभोवती संरक्षण कठडे नसल्याने हा रस्ता अपघाताचे केंद्र बनत आहे. या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात दुपारच्या सुमारास मारुती सियाज (डीएन-०९ एल१९१०) ही कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाल्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
भोसला स्कूलमार्गे पाईपलाईनरोडला जोडणा-या या रस्त्यावर वाहतूक व वर्दळ असते; मात्र या रस्त्यालगत वाहणा-या नाल्याला संरक्षण कठडे नसल्याने सदर ठिकाणी अपघाती स्थळ बनले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर वाहतूकीला वेग आला आहे. रस्त्यावरुन वाहतूक वाढल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गणेशनगर आणि समर्थनगरमधून जाणा-या नाल्यात आज दुपारी कार कोसळून अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तत्काळ सातपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. सोमेश्वर कॉलनी, गणेशनगर, समर्थनगर, खांदवेनगर, गुलमोहर कॉलनी, धु्रवनगर, हनुमाननगर आदि भागातील विद्यार्थ्यांची वाहतूकीचा हाच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यालगत वाहणाºया नाल्याला तातडीने सुरक्षित करण्याची गरज आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित संरक्षण कठडे बांधावे. कारण रस्ता अरुंद असून रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण झाल्यामुळे वाहतूकही वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावर भविष्यात मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.