नांदूर्डीतील आदिवासी वस्तीवरील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 10:43 PM2021-04-20T22:43:34+5:302021-04-21T00:40:42+5:30
नांदूर्डी येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीला पाणीपुरवठा करणारी विहीर. निफाड : सद्यस्थितीत तालुक्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसल्याने टँकरच्या मागणीसाठी ...
नांदूर्डी येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीला पाणीपुरवठा करणारी विहीर.
निफाड : सद्यस्थितीत तालुक्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसल्याने टँकरच्या मागणीसाठी अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारीत असताना नांदुर्डीनजिकच्या आदिवासी वस्तीवरील महिलांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात पायपीट करावी लागत आहे.
निफाड तालुक्यात यापूर्वी जी टंचाईग्रस्त गावे होती त्या गावांवर जाणीवपूर्वक लक्ष घालून तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने आतापर्यंत एकाही गावातून टँकर मागणीचा नवीन प्रस्ताव आलेला नाही. तालुक्याच्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर हा पहिला टप्पा निरंक गेला तसेच जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात एकाही टँकरची मागणी नोंदवण्यात आली नाही.
एप्रिल ते जून या पाणीटंचाईच्या तिसऱ्या आराखड्यात मरळगोई बुद्रुक, गोळेगाव या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भातली प्रशासकीय तयारी ठेवण्यात आलेली आहे. तसेच धारणगाव वीर ,नांदूरमध्यमेश्वर, पिंपळगांव निपाणी या गावात विहिरीचे खोलीकरण करणे, गाळ काढणे ही कामे प्रस्तावित आहेत. पाण्याची टंचाई भासल्यास मरळगोई बुद्रुक, गोळेगाव, कोटमगाव, थेरगाव, रानवड , गोंदेगाव या गावात खासगी विहीर अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. वडाळीनजिक, अंतरवेली, सारोळे खुर्द या गावांमध्ये नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित आहे.
नांदूर्डी येथील गावापासून एक ते दीड किमी अंतरावर आदिवासी बांधवांची वस्ती आहे. या वस्तीत ३०० ते ३५० नागरिक राहतात. या नागरिकांना जवळच असलेल्या विहिरीतून पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. असे असले तरी सदर पाणी हे नागरिक पिण्यासाठी न वापरता फक्त धुणे ,भांड्यासाठी वापरतात. कारण सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार या विहिरीचे पाणी लालसर व पिवळसर रंगाचे असून ते आरोग्यासाठी योग्य नसल्यामुळे ते पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. त्यामुळे या वस्तीवरील महिलांना इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करून आमच्या हालअपेष्टा थांबवाव्यात अशी त्या आदिवासी बांधवांची मागणी आहे. निफाड तालुक्यातील जुन्या काळातील ब्रिटिशकालीन बंधारे दुरुस्त करून त्यातील गाळ काढल्यास पाणी साठवण वाढू शकते त्यामुळे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते, असे नागरिकात बोलले जात आहे.