नातेवाइकांकडून रुग्णालयांमध्ये पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:23+5:302021-04-08T04:15:23+5:30
रुग्णांचे नातेवाईक, कर्मचाऱ्यांमध्ये वाद नाशिक :कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयांमध्ये नातेवाइकांना जाऊ दिले जात नसल्याने रुग्णालय कर्मचारी आणि नातेवाईक यांच्यात ...
रुग्णांचे नातेवाईक, कर्मचाऱ्यांमध्ये वाद
नाशिक :कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयांमध्ये नातेवाइकांना जाऊ दिले जात नसल्याने रुग्णालय कर्मचारी आणि नातेवाईक यांच्यात अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात. कोरोनाचा प्रसार राखण्यासाठी रुग्णालयांकडून ही खबरदारी घेतली जात असली तरी नातेवाइकांमध्ये मात्र यामुळे गैरसमज निर्माण होतात. नातेवाइकांना किमान दुरुन तरी भेटण्यासाठी वेळ ठरवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
साहित्याचे दर वाढल्याने बांधकामाचे बजेट कोलमडले
नाशिक : गतवर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने अनेकांचे घर बांधणीचे बजेट वाढले आहे. यामुळे काहीनी बांधकाम करण्याचा निर्णय तूर्त स्थगित केला आहे तर काहींचे काम अर्धवट स्थितीत अडकले आहे. वाळु, विटा, सीमेंट, लोखंड या साहित्याबरोबरच मजुरीचे दरही वाढल्याने अनेकांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत.
फिरत्या विक्रेत्यांना कोरोना नियमांचा विसर
नाशिक : शहरातील विविध भागात फिरणाऱ्या विक्रेत्यांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. अनेक विक्रेते तोंडाला मास्क न लावताच व्यवसाय करतात. एखाद्या गल्लीत भाजी विक्रेत्याच्या गाड्यांवर महिलांची मोठी गर्दी होते. अशा वेळी फिजिकल डिस्टन्सिंगकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रस्ता खोदल्याने घंटागाडी पोहोचणे कठीण
नाशिक : शडर परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक रहिवाशांनाही खोदलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो. काही भागात यामुळे घंटागाडी पोहोचणे कठीण झाले आहे. यामुळे महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, ही कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गल्ली-बोळातील दुकाने सुरूच
नाशिक : शहर परिसरात प्रशासनाच्यावतीने कठोर निर्बंध लावण्यात आले असल्याने मुख्य बाजार पेठांमधील दुकाने बंद आहेत; मात्र गल्ली बोळातील अनेक दुकाने सुरू आहेत. रस्त्यावरील गर्दीवरही फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसतात, असा नागरिकांना पायबंद घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.