भर उन्हातान्हात पायपीट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:41 PM2020-05-07T23:41:19+5:302020-05-07T23:41:27+5:30
नाशिक : लॉकडाउन वाढतच चाललेले आहे. रोजगार तर नाहीच, परंतु दूरदेशी गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबीयांची चिंता. याच अगतिकतेतून पायी निघालेले मजूर आणि कामगार दररोज नाशिकमार्गे सहकुटुंब जात असून, त्यांची पायपीट अद्याप थांबलेली नाही.
नाशिक : लॉकडाउन वाढतच चाललेले आहे. रोजगार तर नाहीच, परंतु दूरदेशी गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबीयांची चिंता. याच अगतिकतेतून पायी निघालेले मजूर आणि कामगार दररोज नाशिकमार्गे सहकुटुंब जात असून, त्यांची पायपीट अद्याप थांबलेली नाही.
लॉकडाउन आणि संचारबंदी झाल्यानंतरदेखील आपल्या गावाकडे निघालेल्या मजूर आणि कामगारांना सरकारने आहे त्याचठिकाणी थांबण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या तात्पुरत्या निवाराची सोय केली होती. सुरुवातीला पायी जाणाऱ्या आणि काही वेळा कंटेनर, टॅँकरमधून प्रवास करणाऱ्यांना पोलिसांनी अडवले खरे, मात्र स्थलांतरितांची एकूणच संख्या बघितली तर आता पोलीस यंत्रणेनेदेखील जणू सीमांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. नाशिकजवळच भिवंडी, कल्याण, शहापूर या भागात कारखाने आणि आॅनलाइन शॉपिंगचे गोडावून असून त्याठिकाणी असलेले शेकडो कामगार आता काम नसल्याने हवालदिल झाले आहेत. बांधकाम आणि शासकीय ठेकेदारांची कामे बंद, आॅफिसेस बंद आणि पुन्हा जिवाचे संकट अशा स्थितीत निघालेले मजूर एकदुसºयाच्या आधाराने जात आहेत. कुटुंब कबिल्याबरोबरच अत्यावश्यक सामानाचे गाठोडे बरोबर ते जात आहेत.
नाशिक शहरात मुंबई-आग्रा महामार्गावरून जाताना पोलिसांनी हटकू नये यासाठी अनेक जण भर उन्हात उड्डाणपुलावरून जात आहेत. रस्त्यात मिळेल ते खाऊन आणि मुलाबाळांना देऊन तसेच पायपीट करणारे हे स्थलांतरित तसेच पुढे जातात आणि कित्येकदा पुढे झाडाच्या आणि दुकानाच्या सावलीत पहुडतात. अनेक जत्थे पुलाखालून समांतर मार्गाने पुढे जात आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांचे जत्थे अखंडपणे जात असून, काही मुंबई-आग्रा मार्गावरून पंचवटी व तेथून आडगाव मार्गे पुढे जात आहेत. तर काही जत्थे पुणे मार्गावरून जात आहेत. त्यांच्याकडील लहान मुले आणि कुटुंब बघून दररोज अनेक सेवाभावी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. रस्त्याच्या पुलाखाली विश्रांती घेणाºया या श्रमिकांना पाणी तसेच अल्पोपहार तर काही संस्था फूड पॅकेट्स देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत.