द्वारकेवर पाच जीवंत काडतुसांसह पिस्तुल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 04:28 PM2020-07-15T16:28:28+5:302020-07-15T16:28:53+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून गावठी पिस्तुलांची देवाणघेवाणीचा प्रयत्न पोलिसांना आव्हान देणारा ठरत आहे.
नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना अवैधरित्या जवळ शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. द्वारका परिसरात अशाच पध्दतीने एक इसम गावठी पिस्तुलसह पाच जीवंत काडतुसे घेऊन आल्याची कुणकु ण पोलिसांना लागताच पोलिसांनी त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी, अॅक्टिवा दुचाकीने (एम.एच१५ एफएच४४५२) संशयित इसम अराफत फैरोज शेख (२०, इगतपुरी चाळ, वडाळानाका) हा द्वारका परिसरात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे इसम व वाहनाचे वर्णन जुळून आल्याची खात्री पटताच गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार, सहायक निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते, हवालदार सोमनाथ सातपुते, उत्तम पाटील आदिंच्या पथकाने सापळा रचून शिताफीने अराफतला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ३० हजार रूपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तुल व अडीच हजार रूपये किंमतीचे पाच जीवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रू पये किंमतीची दुचाकी असा एकूण ७२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अराफतविरूध्द विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
गावठी पिस्तुलची देवाणघेवाण आव्हानात्मक
शहरात मागील काही दिवसांपासून गावठी पिस्तुलांची देवाणघेवाणीचा प्रयत्न पोलिसांना आव्हान देणारा ठरत आहे. शहरात खुलेआम अशा पध्दतीने जीवंत काडतुसांसह देशी पिस्तुलांची हाताळणी होत असेल तर कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापुर्वीही भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत जुने नाशिक या भागात हाणामाऱ्यांमध्ये तसेच खून व खूनाच्या प्रयत्नात शस्त्रांचा वापर झालेला दिसून येतो. काही दिवसांपुर्वी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत अशाचप्रकारे गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने सापळा रचून मोटारीतून पिस्तुल घेऊन जाणा-या त्रिकुटांना ताब्यात घेतले होते.