नाशकात टमाटा व्यापाऱ्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:18 PM2019-07-15T15:18:29+5:302019-07-15T15:22:18+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.
नाशिक : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सुमाराला घडलेल्या घटनेमुळे शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या शेकडो व्यापारी, आडत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सर्व संचालक मंडळाने पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्याप्रकाराबाबत तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. बाजारसमितीत खंडणी मागणारे आरोपी दुचाकीवरून आल्याचे बाजारसमिती कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून प्रकरणात सहभाग असलेले संशयित व त्यांचे हस्तक बाजारसमितीतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली करीत असल्याचे व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले आहे. या प्रकारामुळे बाजारसमितीत व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्यामाहितीनुसार, बाजारसमितीत सोमवारी सकाळी बाजारसमितीत टमाटा व्यापारी त्याच्या गाळ्यात असताना ऍक्टिव्हा दुचाकीवरून तिघे भामटे आले त्यांनी थेट त्या व्यापाऱ्याच्या गाळ्यात जाऊन त्याला शिवीगाळ करीत हातातील पिस्तूल डोक्याला लावून तर अन्य एकाने हातात दगड घेत डोक्यात मारण्याचा प्रयत्न करून संध्याकाळपर्यंत 50 हजार रुपये खंडणी दे नाहीतर जिवंत ठार मारू अशी धमकी दिली. सदर प्रकरणानंतर त्या व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. दरम्यान,अशा प्रकारे व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याने तसेच दोन ते तीन शेतकऱ्यांना मारहाण केल्यामुळे भयभीत झालेल्या 5 ते 6 व्यापाऱ्यांनी शेतमाल वाहनात न भरताचं बाजारसमितीतून काढता पाय घेतला. बाजारसमितीत गेल्या काही महिन्यांपासून गुंडाराज वाढला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके व खून प्रकरणातील संशयित व आरोपींचे हस्तक व्यापारी, आडत्यांना धमकी देत खंडणी वसूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा व्यापाऱ्यांनी केला आहे. गुंड प्रवृत्तीचे टोळके शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा शेतमाल पळविणे, पैसे काढून घेणे असा प्रकार करत आहेत.