गटारीच्या ड्रेनेजमध्ये दडविले पिस्तूल अन् काडतुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:09+5:302021-07-12T04:11:09+5:30
शहर व परिसरात गुन्हेगारी कृत्य घडविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून वारंवार आपल्या ‘नेटवर्क’द्वारे माहिती घेत कारवाई ...
शहर व परिसरात गुन्हेगारी कृत्य घडविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून वारंवार आपल्या ‘नेटवर्क’द्वारे माहिती घेत कारवाई केली जाते. अशाचप्रकारे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाचे अंमलदार प्रवीण वाघमारे यांना बेकायदेशीर शस्त्र दडवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना याबाबत कल्पना दिली. वाघ यांनी तत्काळ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून ध्रुवनगरला रवाना केले. संशयित आशीष सुनीलदत्त महिरे (२४, रा. निगळ पार्कसमोर, शिवाजीनगर) यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
यावेळी त्याने सातत्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. पोलिसांनी त्यांच्या शैलीत बेकायदेशीर शस्त्राबाबत विचारताच महिरे याने शस्त्र असल्याची कबुली दिली आणि ती कुठे लपविली असल्याचा ठावठिकाणाही सांगितला. एका गटारीच्या चेंबरमध्ये पिस्तूल, काडतुसे लपविली असल्याचे ऐकून पोलीस पथकालाही आश्चर्याचा धक्का बसला.
ध्रुवनगरमधील मोकळ्या भूखंडाच्या बाजूला संशयिताला घेऊन पथक पोहोचले असता ड्रेनेजमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत शस्त्र दडवून ठेवलेले होते. दडवून ठेवलेला हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. हे हत्यार त्याने आपल्या एका मित्राकडून विकत घेतले होते. पोलीस आता त्याच्या मित्राच्या मागावर आहेत. त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.