खोडे मळा येथील उद्यानाची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:46 PM2018-11-14T23:46:02+5:302018-11-15T00:12:31+5:30
येथील प्र्र्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणीनगर येथील खोडे मळा परिसरात असलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून, या उद्यानात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे.
सिडको : येथील प्र्र्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणीनगर येथील खोडे मळा परिसरात असलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून, या उद्यानात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे. उद्यानात सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर वाढला असून, उद्यानाची दुरुस्ती करावी याबाबत महापालिकेला वारंवार कळवूनही याकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणी कॉलनी खोडे मळा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. याठिकाणी मनपाच्या वतीने उद्यानासाठी जागा आरक्षित केली असली तरी या उद्यानाची देखभाल होत नसल्याने दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. या उद्यानात चौहोबाजूंनी गाजर गवत वाढलेले असून उद्यानात असलेले पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. या ठिकाणी घाण व कचरादेखील साचलेला असल्याने डासांचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले. या उद्यानात आमदार निधीतून ग्रीन जिम बसविण्यात आले असले उद्यानातील घाण व बकाल स्वरूपामुळे या ग्रीन जिमचा वापरदेखील करता येत नाही.
या उद्यानाची दुरुस्ती करावी यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश जाधव व अविनाश हिरे यांनी सह्यांची मोहीम राबवून महापालिकेला निवेदनही दिले आहे. परंतु याबाबत मनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशीच दुरवस्था सिडको भागातील इतर उद्यानांची झाली असून याबाबत मनपाने दखल घेऊन उद्यानांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
कामाचा वाद; आयुक्तांची घेणार भेट
काही दिवसांपूर्वी उद्यानाची पाहणी करण्यासाठी बांधकाम व उद्यान विभागाचे अधिकारी येथे आले होते. त्यांनी पाहणी केली, परंतु कोणत्या विभागाने हे काम करायचे यातच अधिकाºयांमध्ये शाद्बिक वाद झाला. यामुळे या उद्यानाचे कामकाज मात्र अद्यापही झाले नसून याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.