गंगापूररोड परिसरात ठिकठिकाणी खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:09 AM2019-09-24T01:09:53+5:302019-09-24T01:10:11+5:30
उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे.
गंगापूर : उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे.
विसे मळा, कृषिनगर, एबीबी सर्कल, आयटीआय सिग्नल ते खुटवडनगर, कृषिनगर ते शरणपूर पोलीस चौकी, संभाजी चौक, सिबल हॉटेल या परिसरातही वाहनधारकांना ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे चुकविण्याच्या दिव्यातून जावे लागत आहे. या खड्ड्यांमधून वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, त्यांना आरोग्याच्या तक्रारीदेखील सतावू लागल्या आहेत. खड्ड्यांमध्ये वारंवार आदळत असल्याने वाहनांचेही नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्र ारी आहेत.
दोनचाकी व चारचाकी वाहनांसह रिक्षावाले या रस्त्याला अक्षरश: वैतागले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते, मणक्याचा, कंबरेचा त्रास यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले. शाळेतील विद्यार्थ्यांना व वृद्ध नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शासन अजून किती जणांचा बळी गेल्यावर या रस्त्याची दुरु स्ती करेल, असा सवाल आता सामान्य नागरिकांना पडला आहे. नागरिकांना पावसामुळे चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच वाहने दामटावी लागत असून, त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. खड्डेच खड्डे चोहीकडे अशी सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांची स्थिती असून, या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पावसामुळे असे समाधानकारक चित्र शहरात निर्माण झाले असले, तरी याच पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे रस्त्यांचा आणि यंत्रणेच्या कामांचा दर्जाही चव्हाट्यावर आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांमधून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर डांबरी रस्त्यांवर अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडलेले असून, ते सहजासहजी निदर्शनास येत नसल्याने तेथे वाहने आदळत आहेत. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या खड्ड्यांपासून वाहनधारकांची सुटका व्हावी याकरिता महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टीही करण्यात आली. अनेक ठिकाणी खडीचा चुरा टाकण्यात आला. विटांचे तुकडे टाकूनही खड्डे बुजविण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून करण्यात आला. परंतु, ही मलमपट्टी कुचकामी ठरत असून, पुन्हा या खड्ड्यांची अवस्था जैसे थे होत आहे.
रस्त्यांची झाली चाळण
गंगापूररोड तसेच या भागातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी केली आहे. रस्ता खराब असल्याने येथील नागरिक आपला जीव मुठीत धरून प्रवास करतात, याठिकाणी मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेच्या शाळा असून, या रस्त्याचा त्रास त्यांनाही सहन करावा लागत आहे.
रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत, नित्यनियमाने नेहमी छोट्या-मोठ्या अपघातांना नागरिकांना सामोरे जावे लागते. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरून जाताना अपघाताला सामोरे जावे लागले होते. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.