लॅमरोडवर ठिकठिकाणी खड्डे
By admin | Published: August 7, 2016 01:57 AM2016-08-07T01:57:19+5:302016-08-07T01:58:10+5:30
लॅमरोडवर ठिकठिकाणी खड्डे
देवळाली कॅम्प : कुंभमेळ्याच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या लॅमरोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ‘रस्त्यावर खड्डे का खड्ड्यातून रस्ता’ हा प्रश्न निर्माण होत आहे.
मागील वर्षी कुंभमेळा होण्यापूर्वी विशेष निधीतून लॅमरोडचे डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हाच १५ दिवसांत डांबर वेगळे अन् खड्डा वेगळा असे स्वरूप असलेल्या रस्ता दुरुस्तीनंतर पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेल्याचे ठिकठिकाणी दिसते. अनेक ठिकाणी रस्त्याखाली आणि बाजूची जागा वर असाही प्रकार रस्त्याने साचलेल्या पाण्यावरून लक्षात येतो. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार होत असतांना छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचा ठेका देताना ठराविक वर्षाच्या देखभालीसाठी असल्याचे सांगितले होते.
गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे नाका नंबर सहा ते कोठारी सदनपर्यंत अनेक खड्डे रस्त्याला
पडले असून, सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत छावणी प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
एसव्हीकेटी महाविद्यालय, लक्ष्मीनारायण मंदिर, ओरिएन्टल गेस्ट हाऊस ते जमात या परिसरात रस्त्यालगत साचणारे पाणी निचरा करण्यासाठी किंवा वाहून जावे याकरिता प्रशासन, लोकप्रतिनिधी कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यासाठी खर्च केलेले सव्वापाच कोटी पाण्यात गेले असल्याची चर्चा लॅमरोडवर रंगत आहे. (वार्ताहर)