रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:07 AM2019-10-08T01:07:18+5:302019-10-08T01:07:35+5:30
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिका आज-उद्या खड्डे बुजेल म्हणता म्हणता तीन महिने लोटले तरी अनेक भागात खड्डे जैसे थे असून, आता महापालिका अपघातांची वाट बघत आहे काय, असा प्रश्न केला जात आहे.
नाशिक : पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिका आज-उद्या खड्डे बुजेल म्हणता म्हणता तीन महिने लोटले तरी अनेक भागात खड्डे जैसे थे असून, आता महापालिका अपघातांची वाट बघत आहे काय, असा प्रश्न केला जात आहे.
पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे यांचे अतूट नाते आहे. पावसाळ्यात खड्डे पडणे स्वाभाविक असले तरी त्यानिमित्ताने महापालिकेच्या रस्त्याचा दर्जा कितपत आहे त्याचे पितळच उघडे पडत असते. कुंभमेळ्यानंतर स्वाभाविकच दोन वर्षे तरी खड्डे पडणार नव्हतेच. कारण सर्व रस्ते नवीन झाले आहेत, असे महापालिका अभिमानाने सांगत होती, परंतु आता मात्र रिंगरोड असो की कॉलनीरोड अथवा नियमित रस्ते सर्वच ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. मध्यंतरी महापालिकेने थोडा पाऊस उघडल्यानंतर काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नंतर ही कच बाहेर आली आणि तिचा वेगळाच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नव्या रस्त्यांचा घाट
४महापालिकेने एकदा रस्ते तयार केले की तीन वर्षे ठेकेदाराचे दायित्व असते. त्यानंतर महापालिकेकडे दायित्व येते. मात्र रस्ता एकदा तयार केल्यानंतर या पाच वर्षे झाले, दहा वर्षे झाले, परंतु अस्तरीकरण झालेले नाही असे सांगून महापालिकेच्या वतीने आता नवीन रस्ते झाले पाहिजे यासाठीच आग्रह धरला जातो. मात्र हे काम करण्यासाठी निधी नसल्याने पुन्हा तीच ती कारणे सांगितली जातात.
खड्डे भरण्याचे कामही निकृष्टच
खड्डे भरण्यासाठी रोड मॅन्यूअलमध्ये ते कसे भरावेत याची कार्यपद्धती दिली आहे. खड्ड्याला चौकोन करून घेऊन मग त्याची भरावे लागण्याची तरतूद आहे. परंतु प्रत्यक्षात कोणीच याबाबत बघत नाही. ठेकेदार आणि त्यांची माणसे खड्डे भरण्याचे काम कसे करतात आहे हे बघण्यासाठी मनपाचे कर्मचारीच उपलब्ध नसतात
मोजकेच रस्ते सुस्थितीत
४शहरातील एमजीरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड असे मोजकेच रस्ते सध्या सुस्थितीत असून, बाकी मात्र रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची भयंकर अवस्था झाली असून, हा ग्रामीण भागातील रस्ता वाटतो. शहरात असे अनेक रस्ते उखडले आहेत.
मटेरियलच संपले !
महापालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या आधीच खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याच्या साहित्य पुरवठ्याचा ठेका दिला जातो. परंतु मध्यंतरी साहित्यच संपल्याने मोठी अडचण निर्माण झाली. त्यानंतर कसे तरी साहित्य उपलब्ध करून कामकाज करण्यात येत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी जाताना त्या घसरत आहेत.