सिन्नर-सायखेडा मार्गावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 07:08 PM2019-11-10T19:08:15+5:302019-11-10T19:08:30+5:30
निफाड आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला सिन्नर-सायखेडा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर बनला आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या आठवड्यात याच मार्गावर नायगाव शिवारात एका प्रवासी जीपने दुचाकीस धडक अशा प्रकारचे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहे.
सिन्नर : निफाड आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला सिन्नर-सायखेडा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर बनला आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या आठवड्यात याच मार्गावर नायगाव शिवारात एका प्रवासी जीपने दुचाकीस धडक अशा प्रकारचे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी सिन्नर-सायखेडा रस्त्याचे काम करण्यात आले आहे; मात्र अवघ्या ११ ते १२ महिन्यांत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चाटोरी, चांदोरी, सायखेडा, नायगाव, जायगाव, देशवंडी या गावातील नागरिक या मार्गाचा सिन्नरला ये-जा करण्यासाठी नियमित वापर करतात. तसेच सायखेडा येथून प्रवासी वाहतूकही या मार्गावरून नेहमीच सुरू असते. सिन्नर औद्योगिक वसाहतीत या भागातील कामगार वर्ग रोजगारासाठी येतो. रात्रीच्या शिफ्टमध्येही बरेचसे कामगार काम करीत असल्याने या खड्ड्यांचा त्यांना अंदाज येत नाही. यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात या मार्गावर झाले आहे; मात्र तरीही बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे रस्त्याचे काम दर्जेदारपणे करून घेण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यांनी पार पाडली नाही. त्यातच नादुरुस्त झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचेही त्यांना सोयरसुतक नसल्याने नायगाव खोºयातून संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावरील खड्ड्यांची समस्या ऐरणीवर आली असून तत्काळ खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या सुरक्षा रक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले आहे.