विंचूर-प्रकाशा महामार्गावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 06:23 PM2019-11-19T18:23:51+5:302019-11-19T18:24:10+5:30
बागलाण तालुक्यातील तरसाळी गावाजवळून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास बांधकाम विभागाने प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी गावाजवळून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास बांधकाम विभागाने प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी गांधीगिरी करत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने दखल घेत खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
परतीच्या पावसामुळे या महामार्गावरील सटाणा ते वरीगावदरम्यान ‘रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या महामार्गावर अनेकांचा बळी जात असून, प्रवाशांना, वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी जवळच असून, नाशिकहून सुरतकडे मोठी वाहतूक होते. राज्या मार्ग असल्याने अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. कोणता खड्डा चुकवावा, कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडत होता. खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होऊन मोटरसायकलस्वार जखमी आहेत.. या महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत होता. वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. रात्री खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गाडी आदळून पाटे तुटणे, पंक्चर होणे, अशा घटना घडत होत्या.