सीआयडी प्रशिक्षण केंद्राच्या जागेचा तिढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:55 AM2018-08-22T00:55:08+5:302018-08-22T00:55:27+5:30
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट पोलीस अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारे विद्यालय नाशिकमध्ये होत असले तरी त्याच भूखंडावर महापालिकेने पाणीपुरवठ्याचे आरक्षण टाकले
नाशिक : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट पोलीस अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारे विद्यालय नाशिकमध्ये होत असले तरी त्याच भूखंडावर महापालिकेने पाणीपुरवठ्याचे आरक्षण टाकले असून, त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. सदरच्या जागेवर पाणीपुरवठ्याचे आरक्षण ठेवून एकत्रितरीत्या महाविद्यालय बांधावे, असा संयुक्त प्रकल्पाचा तोडगा महापालिका आयुक्तांनी काढला आहे. तथापि, राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला ते अव्यवहार्य वाटल्यास प्रशिक्षण विद्यालय नाशिकमधून अन्यत्र स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील पोलीस अधिकाºयांना प्रशिक्षण देणारी महाराष्टÑ पोलीस अकादमी ही मोठी संस्था नाशिक शहरात असून, या संस्थेच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना प्रशिक्षित केले जाते. सध्या संस्थेला जागा अपुरी पडत असल्याने नव्याने सुरू होणाºया गुन्हे अन्वेषण महाविद्यालयाला तेथे जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राजवळ बॉईज टाउन रोडवर असलेल्या जागेवर हे प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर बांधण्याचे अकादमीने ठरवले असून, त्यासंदर्भात महाराष्टÑ राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबईने निविदा काढल्या आहेत. सदरचा भूखंड अकादमीच्या मालकीचा असून, त्यावर मुबलक बांधकाम होऊ शकत असले तरी त्यावर महापालिकेने पाणीपुरवठा विभागाचे आरक्षण टाकले असून त्यामुळेच हा आराखडा मंजुरीविना रखडला आहे. महापालिकेने अकादमीच्या खासगी जागेवर अचानक आरक्षण टाकल्याने अकादमीचे अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत. विशेष म्हणजे या भूखंडापासून रस्ता ओलांडला की तेथे महापालिकेचे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र असून, तेथे मुबलक जागा आहे. कोणी अधिकारी राहात नसल्याने त्यांच्या निवासस्थानात महापालिकेने चक्क पाणीपुरवठा विभागाचे पश्चिम विभागाचे कार्यालय थाटले आहे. तथापि, तेथील जागा सोडून महापालिकेनेदेखील अकादमीच्या जागेवरच पाणीपुरवठ्याची अतिरिक्त कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेने आरक्षण कायम ठेवून अकादमीला जागा वापरण्याची मुभा दिली आहे. तथापि, विद्यालय आणि अन्य बांधकामे येथे शक्य होतील काय याची पडताळणी अकादमी आणि गृहनिर्माण महामंडळ करीत आहे. त्यानंतर विद्यालयाच्या बांधकामाचा निर्णय घेतला जाणार आहे.
महासभेकडे लक्ष : स्थलांतराची मात्र तयारी
महापालिकेच्या वतीने योग्य तो विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने सध्या महासभा काय धोरणात्मक निर्णय घेते याकडे अकादमीचे लक्ष लागून आहे. तथापि, मनपाची नकारात्मक भूमिका कायम राहिल्यास विद्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्याची तयारी सुरू आहे.