लसीकरणाचे नियोजन करा, नागरिकांचे हाल टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:27+5:302021-05-07T04:16:27+5:30
नाशिक- शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसी अपुऱ्या प्रमाणात येत असून, त्याबाबत नागरिकांना पुरेशी कल्पना नसल्याने लसीकरणासाठी नागरिकांना शहरभर फिरावे ...
नाशिक- शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसी अपुऱ्या प्रमाणात येत असून, त्याबाबत नागरिकांना पुरेशी कल्पना नसल्याने लसीकरणासाठी नागरिकांना शहरभर फिरावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे नियोजन करून नागरिकांचे हाल टाळा, अशा कडक सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
नाशिक शहरात सध्या लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. कोणत्या केंद्रांवर कोणती लस मिळणार, हेच नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे सकाळपासून लसीकरण कुठे सुरू आहे आणि आपल्याला हवी ती लस मिळवण्यासाठी फिरावे लागत आहेत, तसेच ज्येष्ठ नागरिकांना तर सकाळपासून उन्हातान्हात उभे राहावे लागते, तसेच अनेक ठिकाणी गर्दी असल्याने आरोग्य नियमांचे पालन हाेत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर नियेाजन करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला पत्राद्वारे दिल्या आहेत.
शहरातील केाणत्या केंद्रांवर आणि खासगी रुग्णालयात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस आहे. त्यातच १ मे पासून १८ वर्षांवरील युवकांनादेखील लसीकरण करण्यात येत आहे. त्यांनी लसीकरण कोठे करावे, फ्रंड लाइनर तसेच अंध, अपंग, अर्धांगवायु, अतिवयस्कर यांना लस देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे, असेही महापौरांनी नमूद केले आहे.
इन्फो..
महापालिकेने उपलब्ध लसींचा साठा किती दिवसांत संपेल, याचा अंदाज घेऊन आगामी डाेसची नोंदणी करावी म्हणजे अखंड लसींचा साठा होऊ शकेल, अशी सूचना महापौरांनी केली आहे. महापालिकेचे यापूर्वी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सूयोग्य नियोजन केले होते, त्यांना सध्या यात समाविष्ट न केल्याने महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.