सप्तशृंगी यात्रोत्सवासाठी २५८ बसेसचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:15 AM2019-09-26T01:15:19+5:302019-09-26T01:15:41+5:30
नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे.
नाशिक : नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यानुसार विभागातील आगारांमधून २५८ बसेसचे नियोजन करण्यात आले असून, पहिले तीन दिवस फक्त कळवण आगाराच्या बसेसची गडावर वाहतूक करता येणार आहे.
दि. २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत देवीचा नवरात्रोत्सव असल्याने जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने गडावर दर्शनासाठी जातात. या कालावधीत नांदुरी गावापर्यंतच खासगी वाहनांना परवानगी असून गडावर जाण्यासाठी केवळ महामंडळाच्या बसेसला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अन्य खासगी वाहने केवळ नांदुरी पायथ्यापर्यंत वाहतूक करू शकणार आहे. नवरात्रोत्सवातील पहिले तीन दिवस कळवण आगाराच्या बसेस नांदुरी पायथा ते सप्तशृंगी गड अशी प्रवासी वाहतूक सुरू ठेवणार आहे. त्यानुसार बसेसची संख्यादेखील वाढविली जाणार आहे. त्यानंतर दि. २ आॅक्टोबरपासून विभागातील इतर आगाराकडून वणी गडासाठी बसेस सोडल्या जाणार आहेत.
शहरातील सीबीएस येथून सर्वाधिक १०६ बसेसच्या माध्यमातून सप्तशृंगी गडासाठी बसेस धावणार आहेत. नाशिक-१ आगारातून ३१, नाशिक-२ आगारातून १५, सटाणा- ०५, सिन्नर-१०, नांदगाव-०३, इगतपुरी-०५, लासलागाव-१०, कळवण-१०, येवला-०५, पेठ-०५ आणि पिंपळगाव आगारातून ०८ गाड्या सीबीएस आगारातून प्रवासी वाहतुकीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. नांदुरी पायथा ते गड या मार्गावर दिवसा ६० तर रात्रीच्या सुमारास ३० बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. कळवण आगारातील सर्वाधिक ३० बसेसचा यामध्ये समावेश आहे. मालेगाव ते गड अशा १५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे. मालेगाव ते गड २५, मनमाड ते गड १५, सटाण्याहून गडापर्यंत ५, दिंडोरीतूनही ५ तर पिंगळगावमधून वणीसाठी ७ गाड्या धावणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वणी येथील यात्रोत्सवानिमित्ताने येथील कामकाजाचा आढावा घेतला. वणीमध्ये झालेला मुसळधार पाऊस, गडावर जाण्यासाठीची ट्रॉली, घाटाची परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या उपायायोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली तसेच काही सूचनादेखील केल्या आहेत. गडावर तसेच गडाच्या मार्गावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठीच्या काही सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.यावेळी पोलीस दलातील अधिकारी, ट्रस्टचे पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.