कोरोनामुळे कोलमडले द्राक्ष उत्पादकांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:34 AM2021-04-26T01:34:55+5:302021-04-26T01:36:32+5:30
कोरोनाच्या संकटामुळे दर न मिळाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले असून, पुढील हंगामाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ जवळ संपुष्टात आला असून, व्यापारीही आता परतीच्या मार्गावर आहेत. मागील वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत.
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे दर न मिळाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले असून, पुढील हंगामाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ जवळ संपुष्टात आला असून, व्यापारीही आता परतीच्या मार्गावर आहेत. मागील वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत.
यावर्षी परदेशातून मागणी कमी असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात निर्यात झाली नाही. याशिवाय द्राक्ष निर्यातीसाठी देण्यात येणारे अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यामुळे निर्यातीसाठी निर्यातदारांचा खर्च वाढल्याने त्याचा निर्यातीवर मोठा परिणाम झाला स्थानिक बाजारातही दर कोसळलेले असल्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही.
यामुळे औषध विक्रेत्यांची देणी आणि इतर खर्चाची तोंडमिळवणी करताना अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या अंतिम टप्यात द्राक्षाचे दर वाढले, पण तोपर्यंत बऱ्यापैकी माल संपला होता त्यामुळे ५ ते १० टक्के शेतकऱ्यांनाच वाढीव दराचा लाभ मिळाला.
यावर्षी आर्थिक नियोजन कोलमडल्याने पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी खरड छाटणीची कामे सुरू आहेत, पण पुढील हंगामासाठी ऑक्टोबर छाटणी महत्त्वाची ठरते ती करावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.