महानगरात ४९५ बेड वाढविण्याचे नियोजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:44 PM2020-07-18T21:44:54+5:302020-07-19T00:41:02+5:30
नाशिक : महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून किमान ४९५ बेड वाढविण्याचा निर्णय नाशिक महापालिका, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये यंत्रणा सज्जतेच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
नाशिक : महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून किमान ४९५ बेड वाढविण्याचा निर्णय नाशिक महापालिका, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये यंत्रणा सज्जतेच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
जुलै महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचे सुरू झालेले थैमान पाहता रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता गृहित धरून नियोजन आखण्यात आले आहे. त्यात झाकीर हुसेन रुग्णालयात जागेची फारशी उपलब्धता नसल्याने तिथे १५ आयसीयू आणि ५ व्हेंटिलेटरची सुविधा वाढविण्यात येणार आहे. अन्य कोणत्या रुग्णालयात किती बेड वाढवता येतील, याबाबत विचार केला जात आहे.
जिल्हा रुग्णालयात १०० बेड
जिल्हाभरातील रुग्णांसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आठवडाभरात अतिरिक्त १०० बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात अन्य सर्व यंत्रणा सज्ज असून, सेंट्रलाइज्ड आॅक्सिजन युनिटची उभारणीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. केवळ इलेक्ट्रिक फिटिंग्जचे काम येत्या आठवड्यात पूर्ण करून अत्यवस्थ रुग्णांसाठी सुसज्ज १०० बेड तैनात केले जाणार आहेत. त्याशिवाय तिथे एकूण ४० व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात येत आहे.
नाशिकरोड बिटको रुग्णालयात २५० बेड
नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातदेखील अतिरिक्त २५० बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिकरोडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने ही वाढ केली जात असून, त्यातील ५० बेड आॅक्सिजन सुविधेसह सुसज्ज राहणार आहेत. अन्य २०० बेड कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
ईएसआयसीत ४० बेड
सातपूर परिसरातदेखील रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अद्याप कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध नसलेले सातपूरचे ईएसआयसी रुग्णालयातही कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळेच ईएसआयसी रुग्णालयात ४० बेड कोरोनासाठी राखीव ठेवण्या-बरोबरच रुग्णांवर उपचारासाठी सर्व सज्जता मनपाच्या यंत्रणेकडून निर्देश देण्यात आले आहेत.
आडगाव मेडिकल कॉलेजला ९० बेड
आडगावच्या मेडिकल कॉलेजला सुमारे ९० अतिरिक्त बेडचे नियोजन करण्यात आले आहे. या रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण ठेवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे त्या अत्यवस्थ रुग्णांना कोणत्याही साधन सुविधांची कमतरता राहू नये, यासाठी ४० व्हेंटिलेटरची
सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.