अस्थिविसर्जन न करता राखेत केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 03:53 PM2019-02-05T15:53:01+5:302019-02-05T15:53:18+5:30
पर्यावरण संवर्धन : चव्हाणके कुटुंबीयांने जपल्या आईच्या स्मृती
सायखेडा : मानवाचा मृत्यू झाला की शरीराची माती होते; आत्मा इहलोक सोडून परलोकात जातो आणि उरते ते नश्वर शरीर! अशी धारणा भारतीय संस्कृती मध्ये आहे. मृत्यूनंतर संबंधितांच्या नातेवाईकांकडून अशा या नश्वर शरीरावर विधी संस्कार करण्याची परंपरा जोपासली जाते. शरीराला भडाग्नि देऊन शिल्लक रहाणारी रक्षा जवळील एखाद्या नदीत टाकली जाते. एकीकडे अस्थिविसर्जनाच्या माध्यमातून जलप्रदुषणाची समस्या गंभीर बनत असतानाच या पारंपरिक प्रथेला फाटा देत किर्तागळी येथील चव्हाणके कुटुंबाने आईच्या मृत्यूनंतर अस्थिविसर्जन न करता आपल्या शेतातील बांधावर त्या राखेत वृक्षारोपण करत आईच्या स्मृती जपण्याचा आदर्श उभा केला आहे.
किर्तगळी येथील सीताबाई पांडुरंग चव्हाणके यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भडाग्नि देऊन शिल्लक राहिलेल्या रक्षा कुठेही नदी पात्रात न टाकता त्या एकत्र जमा करून शेताच्या बांधावर खड्डा खोदून त्यात टाकल्या आणि त्यावर वृक्षारोपण केले. आईच्या आठवणीने लावलेल्या झाडाचे संगोपन करून आईच्या मृत्यूनंतरच्या आठवणी जाग्या ठेवण्यासाठी हा आदर्श उपक्र म राबविला. चव्हाणके कुटुंबाने सुरु केलेल्या या पायंड्याचे परिसरात कौतुक होत आहे यावेळी त्र्यंबक चव्हाणके, विश्वनाथ चव्हाणके, काशिनाथ चव्हाणके शिवाजी चव्हाणके, संतोष,चव्हाणके, दिलीप चव्हाणके, ज्ञानेश्वर चव्हाणके, इंदूबाई त्र्यंबक डावरे ,विनता धनाजी गायधनी, मंगल सोपान गुरु ळे उपस्थित होते.