नदीपात्रात रक्षा विसर्जनाऐवजी वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 05:01 PM2019-06-29T17:01:00+5:302019-06-29T17:01:55+5:30
परंपरा बंद : नवीबेज गावाने रुजविले उपक्रमाचे बीज
मनोज देवरे, कळवण : व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर त्याच्या रक्षा नदीत विसर्जित न करता घरासमोर झाड लावून तेथे टाकण्याचा आदर्शवत असा निर्णय तालुक्यातील नवीबेज गावाने घेतला आहे. नदीला प्रदुषणापासून मुक्त करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन हा हेतू समोर ठेवत रक्षा विसर्जनाची परंपरा बंद करत नवीबेजने एका चांगल्या उपक्रमाचे बीज रोवले आहे.
नवीबेज येथील रहिवासी व मविप्रचे सेवानिवृत्त प्राचार्य जे.एस. पवार यांचे नुकतेच निधन झाले.अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी त्यांची रक्षा गिरणा नदीपात्रात विसर्जित न करता घराजवळ खड्डा करून त्यात टाकत त्यांच्या नावाने एक झाड लावून कुटुंबाने त्याचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच नवीबेजच्या ग्रामसभेत प्रगतशील शेतकरी घनशाम पवार यांनी रक्षा विसर्जन ,तेराव्याचा कार्यक्र म आदी प्रथांबाबत ठराव केला होता. मात्र त्याची अमलबजावणी झाली नव्हती. दरम्यान, पवार यांच्या निधनानंतर घराजवळ खड्डा करून त्यात रक्षा विसर्जन करून वृक्षारोपण कार्यक्र म करण्याचा निर्णय घेत जलप्रदूषण टाळले रक्षा विसर्जनाची परंपराच विसर्जित करून समाजापुढे आदर्श घालून दिला. आता यापुढे नवीबेज गावाने रक्षा विसर्जनाची परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभिनव निर्णय घेतला त्यावेळी शेतकरी नेते देविदास पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, मविप्रचे संचालक अशोक पवार, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष हरिभाऊ वाघ ,यादवराव पवार, बाजीराव पवार, घनश्याम पवार, विजय पवार, प्रा.डॉ.एस.जे.पवार,दादा देशमुख,पोपट पवार,विनोद खैरनार आदींसह पवार कुटुंबिय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.