खड्ड्यातच वृक्षारोपण
By Admin | Published: July 22, 2016 12:02 AM2016-07-22T00:02:03+5:302016-07-22T00:03:21+5:30
घोटी : श्रमजीवी संघटनेचे अनोखे आंदोलन
घोटी : घोटी-त्र्यंबकेश्वर रस्त्याची पहिल्या पावसातच वाट लागली असून, गेल्या वर्षभरापासून वाकी धरणामुळे पाण्यात गेलेल्या रस्त्याला पर्यायी बनवलेला रस्ता दुरुस्त केला नाही. त्यामुळे या नवीन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची त्वरित दुरु स्ती करावी अशी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने गुरुवारी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
घोटी-वैतरणा हा जुना रस्ता वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने शासनाच्या वतीने नवीन तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याचा या वर्षापासून वापर होत आहे. मात्र या रस्त्यावर पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली असल्याने अपघातांच्या प्रमाणात तसेच वाहनांच्या नुकसानीत वाढ होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अनेकदा मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने या भागातील नागरिकांत रोष आहे.
याबाबत आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने रस्त्यात झाडाची लागवड करून अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केले.
या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांच्यासह संतू ठोंबरे, काळू भस्मे, विठ्ठल शीद, निवृत्ती पादिर, शांताराम भगत, भगवान डोके, दिलीप सावंत, पिंटू गांगड, विजय मेंगाळ, शंकर ठोंबरे, संदीप ठोंबरे, संगीता भले आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)