प्लाझ्माचाही काळाबाजार, नाशिकमधून दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:37+5:302021-04-27T04:15:37+5:30

प्लाझ्माचा एकप्रकारे काळाबाजार करणाऱ्या व खासगी कोविड रुग्णालयात बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या दोघा संशयितांच्या सिन्नर पोलिसांनी सहा ...

Plasma black market, two arrested from Nashik | प्लाझ्माचाही काळाबाजार, नाशिकमधून दोघांना अटक

प्लाझ्माचाही काळाबाजार, नाशिकमधून दोघांना अटक

Next

प्लाझ्माचा एकप्रकारे काळाबाजार करणाऱ्या व खासगी कोविड रुग्णालयात बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या दोघा संशयितांच्या सिन्नर पोलिसांनी सहा तासांत मुसक्या आवळल्या आहेत.

सिन्नर येथील एका खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका अत्यवस्थ रुग्णासाठी प्लाझ्माची गरज होती. नातेवाइकांनी प्लाझ्माचा शोध घेतल्यानंतर दलालांमार्फत सदर प्लाझ्मा १८ हजार रुपयांना देण्याचे ठरले. शनिवारी दुपारी ठरल्याप्रमाणे नाशिक येथून एक युवक प्लाझ्माची बॅग घेऊन संबंधित रुग्णालयात आला. मात्र, रुग्णाच्या नातेवाइकांनी ठरलेल्या १८ हजार रुपयांऐवजी त्या तरुणाकडे १२ हजार रुपये दिले.

त्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास दोन युवक दुचाकीहून हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांचा शोध घेत आले. ठरलेले पैसे कमी का दिले याचा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ करत समोरील टेबलवर नकली पिस्तूल ठेवत धमकी दिली.

घटनेची माहिती सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना कळताच त्यांच्यासह पथकाने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहून सिन्नरला प्लाझा घेऊन येणाऱ्या युवकाचा शोध घेण्यात आला. तथापि, या घटनेची त्याला माहिती नव्हती. प्लाझ्मा पोहोच करण्याचे व पेमेंट घेऊन येण्याचे आपल्याला एक हजार रुपये मिळाल्याचे त्याने सांगितले. त्याच्या माहितीवरून सिन्नर पोलिसांनी पंचवटी परिसरातील एका लॉजवर छापा टाकून येथे झोपलेल्या विकी शांताराम जवरे (१९) रा. नाशिक व त्याचा दुसरा साथीदार शुभम समाधान धाडगे (२२) रा. टाकळी, नाशिक रोड यास ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय माळी अधिक तपास करीत आहेत.

इन्फो

प्लाझ्माचा काळाबाजार

सिन्नरला या घडलेल्या घटनेनंतर रेडमेसिविर इंजेक्शनप्रमाणेच प्लाझ्माचा देखील काळाबाजार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्लाझ्माची बॅग साधारण आठ हजार रुपयांच्या आसपास मिळत असल्याचे समजते. मात्र, गरजू व अत्यवस्थ रुग्णांकडून दलालांकडून त्याबदल्यात १८ हजार रुपये घेतले जात असल्याचे उघडकीस आले. सुरुवातीला सदर प्रकरण गंभीर नसून बनावट पिस्तूल असल्याने गुन्हा दाखल होत नाही, असे पोलिसांकडून सांगितले जात होते. मात्र, सोमवारी दुपारी फिर्याद आल्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात भारतीय हत्यार कलम कायदा अन्वये व मुंबई कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Plasma black market, two arrested from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.