दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:26 PM2018-10-15T23:26:29+5:302018-10-15T23:27:50+5:30
मालेगाव : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग लागून सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या सहाय्याने आठ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली.
मालेगाव : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग लागून सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या सहाय्याने आठ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली.
इरफानखान नसीमखान यांच्या मालकीचे मोकळ्या भूखंडावर प्लॅस्टिकचे गुदाम आहे. शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास या गुदामाला आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार, शकील अहमद, मनोहर तिसगे, सुधाकर अहिरे, मोहन बैरागी, रवींद्र महाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीचे भीषण स्वरूप होते. आगीचे लोळ व धुरामुळे परिसरात धावपळ उडाली होती. नागरी वस्तीपासून जवळच असलेल्या या गोदामामुळे भीती व्यक्त करण्यात येत होती.
मोकळ्या भूखंडांवर अनधिकृतपणे गुदामांना परवानगीच कशी दिली जाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुदाम मालकांना नोटिसा बजावूनही गोदामे हटविली जात नाही. शहरात प्लॅस्टिकबंदी असताना प्लॅस्टिक येतेच कसे, असा सवाल निर्माण झाला आहे. अग्निशमन दलाने तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. याप्रकरणी आगीची नोंद घेण्यात आली आहे.