पाथर्डी फाटा परिसरात दुधात आढळले प्लॅस्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:48 AM2019-06-25T01:48:51+5:302019-06-25T01:49:25+5:30
पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.
सिडको : पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.
येथील आनंदनगरमधील द्वारकेश सोसायटीमधील रहिवासी रामाआधार रामशिस सिंग यांनी रविवारी (दि.२३) रोजी सायंकाळी आनंदनगर पोलीस चौकीसमोरील एका स्वीट्स दुकानाच्या बाहेर व्यवसाय करणाºया दूधविक्रेत्याकडून नेहमीप्रमाणे दूध खरेदी केले. दरम्यान, सोमवारी (दि.२४) सकाळी दूध गॅसवर तापायला ठेवले असता त्यातून वेगळाच गंध येऊ लागला व दुधामध्ये गाठी तयार होऊ लागल्याने त्यांना धक्काच बसला. दरम्यान, या दुधाच्या गाठी या प्लॅस्टिकसदृश दिसू लागल्या व रबरासारख्या ताणल्या जाऊ लागल्याने दूध भेसळ केली गेल्याचा त्यांचा संशय बळावला. सिंग यांनी याबाबत नगरसेवक राकेश दोंदे यांना कळविले. यानंतर या ठिकाणी अन्न व भेसळ प्रतिबंध विभागाचे अधिकारी दाखल झाले त्यांची दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.
दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूमध्ये भेसळ करून विक्रीचा प्रकार हा गंभीर असून, याप्रकरणी अन्न व औषध तपासणी विभागात व स्थानिक पोलीस ठाण्यात तक्र ार करणार असल्याचे दोंदे यांनी सांगितले.