प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची निर्मिती, वापरावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:39 AM2019-01-13T00:39:59+5:302019-01-13T00:40:14+5:30
प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बंदी घालण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत.
नाशिक : प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बंदी घालण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाणे गरजेचे आहे. काही वेळेस राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडा याप्रसंगी वैयक्तिकरीत्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकले जातात. हे दृश्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नाही. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हा बोधचिन्हे व नावे अधिनियम १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.