एनडीसीएवर ‘खेळाडू’चा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:30 AM2018-07-29T00:30:05+5:302018-07-29T00:30:26+5:30

जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत खेळाडू पॅनलने अध्यक्ष व सचिव पदासह सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळत परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला आहे

 Players' flag at NDCA | एनडीसीएवर ‘खेळाडू’चा झेंडा

एनडीसीएवर ‘खेळाडू’चा झेंडा

Next

नाशिक : जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत खेळाडू पॅनलने अध्यक्ष व सचिव पदासह सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळत परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला आहे. यानिवडणुकीत एनडीसीएच्या अध्यक्षपदासाठी धनपाल ऊर्फ विनोद शाह यांनी बलविंदर सिंग लांबा यांचा एक हजार ११ मतांनी परावभव केला, तर सचिव पदासाठी समीर रकटे यांनी प्रमोद गोरे यांचा एक हजार एक मतांनी पराभव करून परिवर्तन पॅनलचा दारून पराभव केला.  जिल्हा क्रिकेटचा केंद्रबिंदू आणि सर्व क्रीडा संघटनांमध्ये मानाचे स्थान असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २०१८-२०२१ या कालावधीसाठी अध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार पदासह दहा कार्यकारिणी सदस्यांसाठी शनिवारी (दि. २८) तूपसाखरे लॉन्स येथे मतदान झाले. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम)च्या साह्याने घेण्यात आल्याने निवडणुकीनंतर अवघ्या तासभरातच निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला असून, पुन्हा एकदा सत्ताधारी खेळाडू पॅनलने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर आपला झेंडा फडकवला आहे. खेळाडू पॅनलविरोधात परिवर्तन पॅनल मैदानात उतरल्याने यावर्षी निवडणूक रंगतदार बनली होती. दोन्ही पॅनलकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे नाशिक जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंसह सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. या निवडणुकीत दोन हजार ४८९ सदस्यांपैकी एक हजार ४५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील बहुतेक मतदारांनी सत्ताधारी खेळाडू पॅनललाच पसंती दिल्यामुळे परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानुसार सत्ताधारी खेळाडू पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवत एकहाती बाजी मारली. त्यामुळे खेळाडू पॅनलचे उमेदवार आणि समर्थकांनी निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
जिल्ह्यात क्रिकेटच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची फलश्रृती एनडीसीए निवडणुकीच्या मिळाली. याच कामामुळे सभासदांचा आमच्यावर विश्वास असून, या निवडणुकीच्या माध्यमातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता आम्ही जिल्ह्यात क्रिकेट खेळाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहोत.
- धनपाल (विनोद) शहा, नवनिर्वाचित अध्यक्ष
निवडणुकीच्या तयारीसाठी केवळ चार दिवस मिळाले, मतदार यादीमध्ये मतदारांचे संपर्काची माहितीही पुरेशी नसल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान होते. तरीही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. ही सुरुवात असून, पुढील तयारीला आतापासूनच सुरुवात करणार असून, पुढच्या वेळी चित्र निश्चित बदललेले दिसेल.
- बलविंदरसिंग लांबा,  परिवर्तन पॅनल

Web Title:  Players' flag at NDCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.